लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाच्या वतीने राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल्स, स्टॉल्स सुरू करावेत, असा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल धारकांना पत्र देऊन आपली दुकाने त्वरित सुरू करण्यास सांगितले आहे.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी रेल्वे बोर्डाने लांब पल्ल्याच्या राजधानी स्पेशल रेल्वेगाड्यांची वाहतुक १२ मेपासून सुरू केली आहे. परंतु प्रवासात अनेक प्रवाशांना भूक लागत आहे. रेल्वेस्थानकावरील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्यामुळे त्यांचा नाईलाज होत आहे. अनेक प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करावा लागत आहे. ही गंभीर बाब रेल्वे बोर्डाच्या लक्षात आली. त्यामुळे याची दखल घेऊन रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय कार्यालयांना रेल्वेस्थानकावरील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स त्वरित सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे. बुधवारी नागपूरच्या ‘डीआरएम’ कार्यालयात या बाबतचा आदेश धडकला. त्यानुसार गुरुवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर विभागातील रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल, स्टॉल धारकांना पत्र देण्यात आले. पत्रात रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल्स त्वरित सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राजधानी स्पेशल रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दिले पत्र‘रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल्स सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाचा आदेश मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळाला. त्यानुसार अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यानंतर सर्व हॉटेल्स, स्टॉलच्या संचालकांना पत्र देण्यात आले आहे. लवकरच रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल सुरू होऊन प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग