लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगाजमुना म्हणजे बदनाम वस्ती. पोटासाठी शरीर विकणाऱ्या महिलांचे हे ठिकाण. येथे कामांध पुरुष येतात, विकृत आनंद भोगतात आणि पैसे फेकून निघून जातात. पण, येथील महिलांचे प्रश्न खरंच या चार पैशांनी सुटतात का, त्या या किळसवाण्या व्यवसायाकडे वळतात तरी कशा, त्यांच्यापोटी जन्माला येणाऱ्या लेकरांकडे समाज कसा बघतो, या आणि शेकडो दाहक प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावच्या व्यंकटेश नाट्य मंडळाने गंगाजमुना हे नाटक उभे केले असून, या नाटकाच्या प्रयोगातून गोळा होणारा निधी वारांगनांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी दिला जाणार आहे. या नाटकाने झाडीपट्टीच्या चारही जिल्ह्यात प्रेक्षकांना अंतर्मुख केले असून, नागपुरात पहिल्यांदाच प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषीहक्क गाजवून पत्नी झालेल्या रेणूचा जेव्हा वेश्यालयात जावई सौैदा करतो तेव्हा या नाटकाच्या कथानकाला वेगळे वळण लाभते. या बदनाम वस्तीत नेहमीच फिरत असलेल्या भावाला जेव्हा चारभिंतीआड स्वत:ची बहीण दिसते तेव्हा तो आंतर्बाह्य कोसळतो. या नाटकातील एक प्रमुख पात्र असलेल्या मावशीला एक पोलीस अधिकारी तत्त्वज्ञानाचे डोज पाजायला पाहतो, त्यावेळी वारांगनांच्या आत्मसंवादासमोर त्याला आपला पराभव स्वीकारावा लागतो. निरागस रेणूचा अंत याच वस्तीत तिच्या वडिलांकडून होतो आणि नाटकाचा पडदा पडतो. नाटक या शब्दाच्या सभोवताल असलेले रंजकतेचे वलय दूर सारून थेट मनाला भिडणाºया वास्तवाचे दर्शन घडविणे ही या नाटकाच्या संहितेची खरी ताकद आहे. या नाटकाचे लेखक व झाडीपट्टीतील प्रसिद्ध रंगकर्मी सदानंद बोरकर यांनी गंगाजमुनातील वारांगनांशी प्रत्यक्ष संवाद साधून या कथानकाला मूर्तरूप दिले आहे.रविवारी प्रयोगरविवार १ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग पूर्णपणे धर्मार्थ असून, देणगीदारांकडून गोळा झालेला निधी वारांगनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मागच्या २५ वर्षांपासून कार्य करणाऱ्या आम्रपाली उत्कर्ष संघाला दिला जाणार आहे.
मानवी गिधाडांचे दाहक दर्शन - गंगाजमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 8:42 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावच्या व्यंकटेश नाट्य मंडळाने गंगाजमुना हे नाटक उभे केले असून, या नाटकाच्या प्रयोगातून गोळा होणारा निधी वारांगनांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी दिला जाणार आहे.
ठळक मुद्देव्यंकटेश नाट्य मंडळाची प्रस्तुती : वारांगनांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी प्रयोगाचे आयोजन