नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शिलू गंटावार यांना अपसंपदा प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
२३ जुलै २०१४ रोजी मडावी नामक व्यक्तीने गंटावार दाम्पत्याकडील अपसंपदेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये गंटावार दाम्पत्याकडील संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, त्यांच्याकडे अडीच कोटी रुपयावर असंपदा आढळून आली. त्या आधारावर गेल्या १ जुलै रोजी सीताबर्डी पोलिसांनी गंटावार दाम्पत्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (ए)(बी) अंतर्गत एफआयआर नोंदवला. गंटावार दाम्पत्यातर्फे वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, ॲड. आकाश गुप्ता व ॲड. प्रसाद अभ्यंकर यांनी कामकाज पाहिले.