लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : कामावर गेल्याने घरी कुणीही नसताना घराला आग लागली आणि त्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थळी पडले. त्यामुळे किरायाच्या घरात राहात असलेले संगणक परिचालकाचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. त्यांना चार दिवसांपासून शेजाऱ्याच्या घरी आश्रय घ्यावा लागला आहे. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असून, ही घटना माळेगाव (ता. सावनेर) येथे नुकतीच घडली.
निखिल रामराव कुंभारे, रा. माळेगाव, ता. सावनेर हा ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक असून, ताे माळेगाव येथे विवाहित बहीण व भाचीसाेबतच किरायाच्या घरात राहताे. शुक्रवारी (दि. ७) दुपारी निखिल कामावर गेला हाेता तर बहीण व भाची बाहेर गेल्या हाेत्या. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. त्यातच घरातून धूर निघायला सुरुवात झाली. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घराकडे धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग नियंत्रणात येईपर्यंत घरातील संपूर्ण जीवनावश्यक व गृहाेपयाेगी साहित्य जळाले हाेते. यात त्याला मानधनापाेटी मिळालेल्या सात हजार रुपयांचाही समावेश आहे.
या घटनेची पाेलिसांनीही नाेंद केली आहे. निखिलकडे स्वत:च्या मालकीचे घर नाही. शिवाय, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नव्याने घर बांधणे अथवा त्या किरायाच्या घराची तातडीने दुरुस्ती करणेही त्याला शक्य नाही. त्यातच प्रशासन अथवा स्थानिक लाेकप्रतिनिधींनीही त्याला अद्याप मदत केली नाही. त्यामुळे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून निखिलला मदत करणे गरजेचे आहे.
...
शेजाऱ्यांकडे आश्रय
निखिलची बहीण तिच्या पतीपासून विभक्त राहात असल्याने तिच्या व भाचीच्या पालनपाेषणाची जबाबदारी निखिलच सांभाळताे. संगणक परिचालकांचे मानधन आधीच कमी असून, तेही वेळेवर मिळत नाही. त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर नाही. त्यातच आगीमुळे नुकसानीत आणखी भर पडली. घर जळाल्याने राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ताे, बहीण व भाची पाच दिवसांपासून शेजाऱ्यांकडेच राहात आहेत.