कन्हान (नागपूर) : वेकाेलीच्या काेळसा खाणीत करण्यात आलेल्या अधिक क्षमतेच्या स्फाेटामुळे कांद्री, कन्हान (ता. पारशिवनी) शहरातील हरीहरनगर भागात असलेल्या घरांना हादरे बसले आणि काैलारू घर काेसळले. या घराच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वडील व पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना साेमवारी (दि. २८) दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास घडली.
कमलेश गजानन कोठेकर (३२) व यादवी कमलेश कोठेकर (५, रा. हरीहरनगर, कांद्री, कन्हान) अशी मृतांची नावे आहेत. कमलेशने यादवीला दुपारी शाळेतून घरी आणले. यादवी ही कन्हान शहरातील धर्मराज शाळेतील केजी-टूची विद्यार्थिनी हाेती. जेवण केल्यानंतर दाेघेही काैलारू घरात गेले. तिथे कमलेश आराम करीत हाेता, तर यादवी घरात खेळत हाेती. काही वेळात संपूर्ण घर काेसळले आणि घराच्या ढिगाऱ्याखाली दाेघेही दबले गेले. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी कमलेश व यादवीला जखमी अवस्थेत बाहेर काढले व कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती दाेघांनाही मृत घाेषित केले. तहसीलदार दुसावार, ठाणेदार सार्थक नेहेते, सहायक पोलिस निरीक्षक पराग फुलझेले, चेतन चव्हाण, मंडळ अधिकारी गुडे, माजी सरपंच बलवंत पडोळे, बबलू बर्वे, योगेश वाडीभस्मे, शरद वाटकर, तलाठी शिरसागर, भांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दुकान बंद असल्याने विश्रांती
कमलेश काेठेकर यांचे कांद्री येथे सलून आहे. या दुकानाच्या भरवशावर ताे कुटुंबीयांची उपजीविका करायचा. साेमवारी दुकान बंद ठेवले जात असल्याने ताे दुपारी घरी विश्रांती करीत हाेता. विशेष म्हणजे, त्याचे स्लॅबचे घर असून, शेजारी त्याच्याच मालकीचे मातीच्या बांधकामाचे काैलारू घर हाेते. त्या घरात विश्रांती करणे दाेघांच्या जीवावर बेतले. कमलेश घरातील कर्ता पुरुष हाेता.
काेळसा वाहतूक बंद पाडली
संतप्त नागरिकांनी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार डी. एम. रेड्डी, रश्मी बर्वे, गज्जू यादव यांच्या नेतृत्त्वात वेकोली सब एरिया मॅनेजर दीक्षित यांची भेट घेत त्यांना घेराव घातला. कमलेशचे घर खाणीतील स्फाेटामुळे काेसळले नाही, असा दावा दीक्षित यांनी केला. त्यामुळे घर नेमके कशामुळे काेसळले, हे कळायला मार्ग नाही. मुळात खाणीतील स्फाेटांच्या हादऱ्यांमुळे या भागातील प्रत्येक घराच्या भिंतींना तडे गेल्याचे स्पष्ट दिसून येते. यावेळी नागरिकांनी वेकाेलीची काेळसा वाहतूक बंद केली हाेती.