लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : भिष्णूर (ता. नरखेड) येथील घरात बुधवारी (दि.१५) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास आग लागली. यात घरातील बहुतांश साहित्य आगीच्या भक्ष्यस्थळी पडल्याने किमान दाेन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगपीडिताने दिली. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.
सविता गणेश दवलकर, रा. भिष्णूर, ता. नरखेड या आशासेविका म्हणून काम करतात. त्यांचे कुटुंबीय बुधवारी रात्री गाढ झाेपेत असताना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरातून माेठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांना वेळीच जाग आली आणि त्यांनी लगेच घराबाहेर काढता पाय घेतला. शिवाय, घराला आग लागल्याचे कळताच नागरिकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली.
नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग नियंत्रणात येताच घरातील संपूर्ण गृहाेपयाेगी साहित्य, धान्य, राेख रक्कम, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळाल्याने किमान दाेन लाख रुपयांचे नुकसान झाले. सविता दवलकर यांच्या पतीचे आधीच निधन झाल्याने, तसेच उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने त्या मिळणाऱ्या मानधनावर उदरनिर्वाह करतात.
पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर यांनी गुरुवारी (दि.१६) सकाळी घराची पाहणी करीत सविता दवलकर यांना दिलासा दिला. त्याचवेळी तलाठी नाखले यांनी पंचनामाही केला. सविता दवलकर यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
160921\img_20210916_143657.jpg
फोटो ओळी. झालेल्या घटनेची पाहणी करताना सभापती नीलिमा रेवतकर, पटवारी व इतर नागरिक.