- लॉक अनलॉक : महागड्या टाळ्यांवर चोरट्यांचे स्वस्त हातोडे जोमात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्याप्रमाणे घुस किंवा उंदीर मजबूत घरांनाही पोखरून काढतात, त्याचप्रमाणे चोरटेही संपूर्ण टाळेबंदी घरात घुसखोरी करतात, हे सर्वज्ञात आहे. चोरी झाल्यावर पोलीस रिपोर्ट होते आणि तद्नंतरची कारवाई होते. मात्र, संबंधित घराचे झालेले नुकसान भरून काढता येत नाही. त्यामुळे, सजगता हेच सर्वात मोठे कुलूप आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
घराच्या सुरक्षेसाठी हजारो प्रकारचे कुलूप आज बाजारात आहेत. मात्र, एकसाथ हजार कुलूप लावले तरी चोरट्यांपासून संरक्षण होईल, याची हमी कुणीच देत नाही. आज कुलपांसोबतच सीसीटीव्हीचाही वापर सुरक्षेसाठी म्हणून केला जातो. मात्र, तेही असे थोडके अशीच स्थिती आहे. सर्वसामान्यांपासून ते धनाढ्यांकडे दणकट म्हणवल्या जाणाऱ्या सुरक्षा कुलपांची तयारी असते. मात्र, एक लहान हातोडा म्हणा वा चोरट्यांनी अवगत केलेली चोरीची नवनवी तंत्रे एका झटक्यात ते कुलूप तोडले जाते. लॉक-अनलॉक करण्यात चोरटे सराईत झाले. मात्र, चोरट्यांच्या या क्रियेला पायबंद घालणारे सगळेच प्रयत्न अवसानघातकी ठरल्याचे अनेक घटनातून दिसून आले आहे.
----------
* स्वस्त कुलूप - २० रुपयापासून ते २०० रुपयापर्यंत.
* मध्यम किमतीचे कुलूप - ५०० रुपयापासून ते १००० रुपयापर्यंत.
* महागडे कुलूप - १२०० रुपयापासून ते २५,००० रुपयापर्यंत
----------
* कुलपांचे प्रकार
अगदी पारंपरिक टाळे यापासून ते कॉम्प्युटराईज्ड किल्ल्या असलेले कुलूप. शिवाय, काही टाळे मोबाईल ॲपद्वारे उघडता-बंद करता येणारेही आहेत. सर्वसामान्यांकडून साधे पारंपरिक टाळेच घेतले जातात. मात्र, मुख्य द्वारासाठी महागडे आणि सुरक्षेची हमी असणाऱ्या टाळ्यांची मागणी केली जाते.
* जास्त मागणी - पॅड लॉक, ट्विन बोल्ट, ट्राय बोल्ट लॉक, लेंच लॉक, नॉब लॉक
* श्रीमंतांकडून होणारी मागणी - ॲस्ट्रो, अल्ट्रीक्स, ॲक्वॉरियस, पोन्टास लॉक, ऑटोमॅटिक, सेन्सर, बायमेट्रिक लॉक, एअर लॉक, कॅम लॉक, डेडबोल्ट लॉक, मोर्डिस लॉक
* दणकट कुलूपांची अशी कुठलीही रेंज नाही. सगळ्याच कुलपांवर सराईत चोरटे हात साफ करतात. त्यामुळे, कुलपांसोबतच सजगता अत्यंत महत्त्वाची असल्याचे कुलपांचे विक्रेते सांगतात.
* कुलपांचे कितीही प्रकार असले तरी लोक लोखंडी आणि पितळेचे कुलूप घेतातच. प्रत्येकच कुलपांमध्ये आठ लिव्हर असतात आणि हे तंत्र बनविणाऱ्यांपासून ते चोरट्यांपर्यंत सगळ्यांनाच अवगत आहे.
- मोहम्मद इक्बाल, स्ट्रीट सेलर
.........