गडकरींनी केली पाहणी : नंदनवनमधील पायलट प्रोजेक्ट पूर्णत्वाकडेनागपूर : कमी किमतीत स्वत:च्या मालकीचे घर खरेदी करण्याचे गरिबांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन साकारलेल्या योजनेंतर्गत फक्त साडेतीन लाख रुपयांमध्ये सुमारे ५०० चौरस फुटाचा फ्लॅट मिळणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून नंदनवनमधील दर्शन कॉलनीच्या परिसरात १६ फ्लॅटची तीन मजली इमारत उभारण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रविवारी सकाळी नितीन गडकरी यांनी एस्सल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्यासोबत या गृह प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शहरात अशी ५० हजार घरे बांधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. पायलट प्रोजेक्टअंतर्गत कमी किमतीचे घर उभारण्यासाठी नासुप्रने जमीन उपलब्ध करून दिली असून, एसजी ग्रुपतर्फे नि:शुल्क बांधकाम करून दिले जात आहे. तळमजला व त्यावर तीन मजले असलेल्या या इमारतीच्या बांधकामात फक्त पायव्यातच सिमेंट कॉँक्रिटचा वापर केला आहे. इमारतीचा संपूर्ण ढाचा प्रमाणित लोखंडापासून तयार केला आहे. वीज प्रकल्पातून बाहेर पडणारी राख व थर्माकोलचा वापर करून तयार केलेल्या पॅनलचा भिंतीसाठी वापर केला जात आहे. यामुळे बाहेरच्या तापमानापेक्षा घरातील तापमानात सुमारे ५ अंशाचा फरक राहील. यामुळे कडक उन्हाळ्यातही ही घरे थंड राहतील. विशेष म्हणजे ही घरे किमान ५० वर्षे टिकतील व ६ रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा या घरांवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा बांधकाम करणाऱ्या एसजी ग्रुपने केला आहे. ५० हजार गरिबांना स्वस्तात घर गरिबांना स्वस्तात घर देण्याचा आपला संकल्प आहे. स्वस्त घरांचा नंदनवन येथे उभारण्यात येत असलेला पायलट प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. २० फेब्रुवारीच्या आसपास आपण सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या पायलट प्रोजेक्टची पाहणी करू. सर्वांनी पसंती दाखविली तर अशी ५० हजार घरे बांधली जातील. ज्यांच्या नावावर घर नाही, त्यांना प्राधान्याने या योजनेंतर्गत घर दिले जाईल. यासाठी लागणारी सुमारे २५० एकर जागा नासुप्रने शोधली आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्रीवीज, गरम व फिल्टर पाणी मोफत५३३ चौरस फुटाच्या (सुपर बिल्टअप) फ्लॅटमध्ये हॉल, एक बेडरूम, किचनसह स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था आहे. दर्जेदार टाईल्सचा वापर केला जात असून भिंतींना पुटिंग व पेंटिंग करून दिले जाणार आहे. संपूर्ण घरात एलईडी लाईट लावले जातील. इमारतीच्या छतावर सोलर पॅनल लावले जातील. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना मोफत वीज मिळेल. २४ तास गरम पाणी व पिण्याचे फिल्टर केलेले पाणीही मोफत मिळेल.
गरिबांना साडेतीन लाखात घर
By admin | Published: February 01, 2016 2:51 AM