लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : वादळी पावसामुळे थडीपवनी (ता. नरखेड) येथील शेतमजुराचे घर काेसळले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नुकसानग्रस्ताने दिली. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
किसन सावरकर, रा. थडीपवनी, ता. नरखेड हे दिव्यांग असून, शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराचे बांधकाम माती-दगडाचे व जुने आहे. दरम्यान, शनिवारी रात्री थडीपवनी येथे मुसळधार पाऊस व वादळाला सुरुवात झाली. त्यातच भिंतीमध्ये पावसाचे पाणी मुरल्याने त्या खिळखिळ्या झाल्या आणि रात्री घर काेसळायला सुरुवात झाली. घटनेच्यावेळी घरातील सर्व सदस्य जागे हाेते. घर काेसळत असल्याने लक्षात येताच त्यांनी लगेच घराबाहेर पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही.
यात घरातील सर्व गृहाेपयाेगी साहित्य, धान्य व इतर वस्तू ढिगाऱ्याखाली दबल्याने त्या खराब झाल्या. त्यामुळे यात आपले किमान २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती किसन सावरकर यांनी दिली. माहिती मिळताच सरपंच नीलिमा उमरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून किसन सावरकर यांना दिलासा दिला. या घटनेमुळे किसन सावरकर यांच्यावर संकट काेसळले आहे. त्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली असून, त्यांना लवकर मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच नीलिमा उमरकर यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा साेमवारी (दि. १३) केला जाणार असल्याचे तलाठी दिगांबर कंडे यांनी सांगितले.
120921\img-20210912-wa0122.jpg
फोटो ओळी. किसन सावरकर यांचे पावसामुळे कोसळलेले घर.