‘कॅप’च्या पहिल्या फेरीची यादी घोषित : सर्वांनाच मिळणार प्रवेशनागपूर : ‘सीईटी सेल’तर्फे अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ‘कॅप’च्या पहिल्या फेरीची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिलेच वर्ष असूनदेखील नागपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वच्या सर्व जागांचे वाटप करण्यात आले आहे. यातील बहुतांश जागांवर प्रवेश होतील असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.नागपूर विभागात मागील वर्षी ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयांत २६ हजार जागा होत्या. यंदा चार महाविद्यालये बंद झाल्याने जागांची संख्या कमी झाली आहे. अभियांत्रिकीमधील रिक्त जागा हे महाविद्यालयांसाठी चिंतेचे कारण झाले होते. प्रवेश कसे होतील हा महाविद्यालयांसमोरील मोठा प्रश्न असायचा. रिक्त जागांमुळे महाविद्यालयांसमोर विविध अडचणीदेखील येत होत्या.परंतु यंदा मात्र स्थिती बदललेली दिसून येत आहे.अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘सीईटी’मध्ये पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेशाचा ‘कोटा’ पूर्ण होण्याची चिन्हे दिसून येत होती. परंतु प्रत्यक्षात यंदा अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेसाठी २५,६७० जागांसाठी १९,५७० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. त्यामुळे अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. तर यंदा विभागात सुमारे सहा हजार जागा रिक्त राहणार हे तर निश्चितच आहे.‘कॅप’च्या पहिल्या फेरीची वाटपयादी जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच लागली आहे. ‘एलआयटी’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यासह अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागांचे ‘हाय कटआॅफ’सह वाटप झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तर ३०० जागांचेदेखील वाटप झाले आहे. (प्रतिनिधी)
शासकीय अभियांत्रिकीला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद
By admin | Published: June 30, 2016 3:09 AM