भूमिअभिलेख विभागाचा पुढाकार : महानगरात १८ गावांचे सर्वेक्षण सुरूअमरावती : बडनेरा व अमरावती नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर होताना १८ गावठान गावांचा समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, या गावठानमधील मालमत्तांना पीआर कार्ड मिळत नव्हते. परंतु आता या घर मालकांना पीआर कार्ड (मालकी हक्क सनद) देण्याचीे मोहिम सुरु झाली असून त्याकरीता भूमिअभिलेख विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे.महसूल व वन विभाग शासन निर्णयानुसार जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख यांनी १७ आॅगस्ट २०१५ रोजी भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करण्याचे ठरविले होते. त्यानुसार अमरावती महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावठानचे सर्वेक्षण करून या गावातील घरांचे नकाशे तयार करणे, मूळ कागदपत्रांची चौकशी करुन मालक ठरविणे, ६/२ नुसार मालमत्तांचे मालक निश्चित करणे यासाठी भूमापन मोहिम राबविण्यात आली. यापूर्वी गावठानच्या गावांना पीआर कार्ड मिळत नव्हते. शासन, प्रशासन स्तरावर सबंधित मालमत्ता धारकांना ६/२ चा आधार घेत व्यवहार करावे लागत होते. मात्र, नवीन शासन निर्णयानुसार गावठानमधील घरांना पीआर कार्ड देण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. घर मालकांना पीआर कार्ड देताना भूमि अभिलेख विभाग भूमापन आणि घटकदार खर्च घेत असल्याची माहिती आहे. नगरपरिषेद असताना ही गावठान गावे वेगळी होती. या गावांचा स्वतंत्र कारभार होता. परंतु महापालिका सीमा वाढविताना गावठानची १८ गावे समाविष्ट करण्यात आलेत. गावठानची गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही या गावांची नोंद ही गावठान म्हणून कायम होती. त्यामुळे गावठानच्या गावांना महसूल दत्फरी तलाठ्याकडून पीआर कार्ड नव्हे तर ६/२ दिले जात होते. १८ गावठानच्या गावांना महापालिका हा दर्जा बहाल झाला असताना घरे, मालमत्तांची नोंद मात्र वेगळी होती. त्यामुळे १७ फ्रेबुवारी १९९८ च्या अधिसूचनेनुसार गावठानच्या १८ गावांचे सर्वेक्षण करुन घरांना पीआर कार्ड देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक के. एस. हट्टेकर, उपसंचालक आर. जी. लाखाडे यांच्या मार्गदर्शनात मोहिम राबविली जात आहे. काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या गावठानमधील १८ गावातील घरांना पीआर कार्ड मिळण्याची दारे उघडण्यात आली आहे.
गावठानमधील घरांना आता मिळणार पीआर कार्ड
By admin | Published: December 11, 2015 12:33 AM