नागपूर : आमदार चंद्रशेखर बावनकळे यांच्यासह भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद कशी घेतली, त्यांना याची परवानगी कुणी दिली, याचा जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. पोलीस आयुक्त हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप करीत शासकीय इमारतीत पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
ज्वाला धोटे यांनी समर्थकांसह पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल होत आपल्यालाही महत्त्वाच्या मुद्द्यावर पोलीस आयुक्त कार्यालयातच सहाव्या माळ्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद घ्यायची आहे, असा आग्रह धरला. त्यांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता आमदार बावनकुळे यांना कोणत्या अधिकारात पत्रकार परिषद घेऊ दिली, असा सवाल त्यांनी केला.
प्रशासकीय इमारतीत राजकीय पक्ष पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करावे तसेच पत्रकार परिषद घेण्याची संमती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास सोमवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जलत्याग व आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी पोलिसांनी पत्रकारांना निघून जाण्याचा इशारा केला असता धोटे भडकल्या. पत्रकारांना हुसकावून लावाल तर इथल्या पूर्ण काचा फोडेल, असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला.
राष्ट्रवादीचीही सदर पोलिसांत तक्रार
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, अर्शद सिद्धीकी आदींनी शनिवारी दुपारी सदर पोलीस ठाणे गाठले. आ. बावनकुळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग केल्याची तक्रार करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांची खुर्ची बाजूला करून आपण पत्रकार परिषद घेतल्याचे सांगितले, ही गृह विभाग व शासकीय यंत्रणेची थट्टा आहे. उद्या कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेण्याचा आग्रह धरतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करू, असा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.