आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : खरीप हंगाम सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना बैलजाेडीची नितांत आवश्यकता असते. काेराेना संक्रमणामुळे प्रशासनाने गुुरांच्या बाजारावर घातलेली बंदी अद्याप उठवली नाही. त्यामुळे बैलजाेडीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना नानाविध अडचणींना सामाेरे जावे लागत असून, गरजू शेतकऱ्यांवर बैलजाेडी विक्रेत्या शेतकऱ्यांच्या शाेधात गावाेगाव भटकण्याची वेळ ओढवली आहे.
खरीप हंगामाच्या ताेंडावर बैलजाेडीच्या खरेदी विक्रीमध्ये दरवर्षी माेठी उलाढाल हाेते. काेराेना संक्रमणामुळे जिल्हा प्रशासनाने मार्च-२०२० पासून इतर बाजारांसाेबतच गुरांच्या बाजारावरही बंदी घेतली. संक्रमण कमी हाेताच प्रशासनाच्या आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठा व आठवडी बाजार सुरू करण्यात आले. मात्र, गुरांच्या बाजारांवरील बंदी कायम राहिली.
बैलजाेडीचा किंवा जाेडीतील एका बैलाचा अपघाती (वीज काेसळून, सर्पदंश), नैसर्गिक अथवा अन्य कारणामुळे मृत्यू झाल्यास अथवा बैलजाेडी काम करण्याच्या लायकीची राहिली नसल्यास संबंधित शेतकरी बैलजाेडी किंवा जाेडीतील बैल बदलवतात. हे व्यवहार सहसा खरीप हंगामाच्या ताेंडावर माेठ्या प्रमाणात केले जातात.
गुरांचा बाजार बंद असल्याने बैलजाेडीच्या शाेधात गावाेगाव फिरावे लागते. त्यात वेळ व पैसा खर्च हाेताे. गावातील काेणता शेतकरी बैलजाेडी विकताे, याबाबत माहिती नसल्याने अडचणी येतात. त्यातच एक बैल विकत घ्यावयाचा असल्यास माेठ्या अडचणी येतात. गावात पर्याय उपलब्ध राहात नसल्याने प्रसंगी चढ्या भावाने बैलजाेडीची खरेदी करावी लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
कळमेश्वर तालुक्यात कळमेश्वर व माेहपा या दाेन्ही ठिकाणचे गुरांचे बाजार काेराेना संक्रमणामुळे मार्च - २०२० पासून बंद आहेत. व्यापारी चढ्या भावाने गुरांची विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. शेतकऱ्यांना गुरांचे बाजार सुरू हाेण्याची प्रतीक्षा असली तरी प्रशसन मात्र यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही.
...
बाजारामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुकर
गुरांच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची जनावरे विक्रीला आणली जात असल्याने बैलजाेडीचे खरेदी व विक्रीचे व्यवहार सुकर हाेतात. शिवाय, बाजारात विविध पर्याय उपलब्ध हाेत असल्याने आपल्याला हवे तसे व हवे त्या किमतीत बैल निवडणे साेपे जाते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. गुरांचे बाजार बंद असल्याने बैलजाेडीच्या निवडीवर बंधने आली असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
...
व्यापाऱ्यांचा फायदा
गुरांचे बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी गावाेगाव फिरून गुरे विकणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती घेतात. बहुतांश शेतकरी आर्थिक निकड असल्याने कधी अधिक किमतीत त्यांची जनावरे व्यापाऱ्यांना विकतात. गरजू शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्याच्या दावणीतील बैलजाेडी किंवा एक बैल चढ्या दराने खरेदी करावी लागत असल्याने नुकसान हाेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
...
बैलजाेडी खरेदी करायची असल्याने मी कळमेश्वर व माेहपा येथील बाजारात अनेकदा गेलाे. बाजार बंद असल्याने बैलजाेडी खरेदी करणे शक्य झाले नाही. बैलजाेडीसाठी गावाेगाव फिरलाे. पण, बैलजाेडी मिळाली नाही. गुरांचे बाजार सुरू असते तर मला हवी तशी, हव्या त्या किमतीत बैलजाेडी खरेदी करणे सहज शक्य झाले असते.
- भगवान सलाम, शेतकरी,
रा. लाडई, ता. कळमेश्वर.