लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिछाडीवर असलेल्या नागपूर शहराची ‘क्लीन सिटी’ म्हणून असलेली ओळखदेखील मिटण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग होत आहे. केंद्र सरकारद्वारा सर्व शहरांतील नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता ‘अॅप’ बनविण्यात आले आहे. या ‘अॅप’ला ‘डाऊनलोड’ करुन या माध्यमातून आपल्या परिसरातील अस्वच्छतेची माहिती मनपाला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोबतच एखादी तक्रार आली तर त्याचे समाधान करण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. २०१७ साली ५० हजारांहून अधिक नागपूरकरांनी हे ‘अॅप’ डाऊनलोड केले होते. मात्र असे होत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी हे ‘अॅप’ वापरणे कमी केले. आता शहराला ‘स्वच्छ’ ठरविणाऱ्या ‘रॅकिंग’मध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.दर महिन्याला बनत आहे अहवालसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये केंद्राकडून स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येईल. याची तयारी वर्षभरापासून सुरू आहे. याचा दर महिन्याला अहवाल बनविण्यात येतो. पुढील मार्चपर्यंत जो अहवाल बनेल त्याच्या आधारावर शहरांचे ‘रॅकिंग’ निश्चित करण्यात येईल. मात्र या ‘अॅप’पासून नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याने अंतिम ‘रँकिंग’मध्ये नागपूर माघारण्याची शक्यता आहे.आयुक्तांसाठी मोठे आव्हानबुधवारी मनपाचे नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार सांभाळला आहे. याअगोदरचे आयुक्त वीरेंद्र सिंह आपल्या कार्यकाळात शहराचे ‘रँकिंग’ सुधारण्यासाठी खास करू शकले नाही. अशात नागपूरची ‘क्लीन सिटी’ ही ओळख बनवून ठेवण्यासाठी आपल्या चमूकडून काम करवून घेणे व सोबतच शहरातील नागरिकांचा परत विश्वास जिंकण्याचे आव्हान बांगर यांच्यासमोर आहे.प्रशासनाच्या सुस्तीमुळे नागरिकांची निराशास्वच्छता सर्वेक्षणाअंतर्गत २०१६ मध्ये ‘लॉंच’ करण्यात आलेल्या स्वच्छता ‘अॅप’कडे या वर्षी नागरिकांचा ओढा कमी का झाला याची ‘लोकमत’ने चाचपणी केली. मनपा प्रशासनाने २०१६ व २०१७ मध्ये हे ‘अॅप’ डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी जी ताकद लावली, ती तक्रारींचे निवारण करण्यासाठी लावलेली नाही. या वर्षी प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र येत्या काळात प्रणाली सुधारेल असा दावा मनपा अधिकारी करत आहेत.मूल पहिल्या क्रमांकावरस्वच्छता ‘अॅप’ डाऊनलोड करणाऱ्याच्या बाबतीत विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहर पहिल्या क्रमांकावर आहे. २५ हजार ४४९ लोकसंख्या असलेल्या या शहरात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व त्यांचे प्रशासनाकडून झालेले निराकरण या बाबी १०० टक्के आहेत.कुठे आहे नागपूर ?स्वच्छता ‘अॅप’ डाऊनलोड करणे व मनपाकडून तक्रारींचे समाधान करणे याबाबतीत नागपूर शहर ५१६ व्या क्रमांकावर आहे. या सर्वेक्षणात एकूण पाच हजार शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ५१६ व्या स्थानी नागपूरसोबतच राजस्थानमधील गंगापूर व महाराष्ट्रातील श्रीगोंदा ही शहरे आहेत. शहराला आॅक्टोबर मध्ये १७ टक्के तर नोव्हेंबरमध्ये १८ टक्केच गुण मिळू शकले. मागील तीन महिन्यात या ‘अॅप’च्या माध्यमातून लोकांनी अस्वच्छतेचे फोटो अपलोड करुन तक्रारी तर केल्या. मात्र मनपा प्रशासनाने यातील केवळ १३१ तक्रारींचेच समाधान केले. सप्टेंबरमध्ये १७० तक्रारी प्राप्त झाल्या व यातील ४७ सोडविल्या गेल्या. आॅक्टोबरमध्ये १६० पैकी केवळ १६ तर नोव्हेंबर महिन्यात १६१ पैकी ६८ तक्रारी सोडविल्या गेल्या.कशी होईल सुधारणा
- जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता ‘अॅप’ डाऊनलोड केले, तर शहराचे ‘रँकिंग’ सुधारेल.
- जास्त प्रमाणात नागरिकांनी अस्वच्छतेचे फोटो अपलोड करुन तक्रार केली तर ‘रॅकिंग’ सुधारेल
- तक्रारींची दखल घेऊन वेगाने त्यांचे निवारण झाले तर शहराचे ‘रँकिंग’ सुधारेल.