सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनांमधून उत्सर्जित होणारे घातक घटक वातावरणात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देताना ‘पीयूसी’ तपासणी करण्याचे निर्देश दिले. यासाठी डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, हे यंत्र आजही डब्यातच पडून असून, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाहनांमध्ये जाळल्या जाणाऱ्या इंधनांमुळे वातावरणात सतत वायू उत्सर्जित होतो. या वायूमध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईड, पार्टोक्युटेल मॅटर या घातक घटकांचा समावेश असतो. हे घटक मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. ही तपासणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी आरटीओ कार्यालयातून फिटनेस प्रमाणपत्र देताना वाहनाची प्रदूषणाची पातळी ओळखण्यासाठी ‘पोल्युशन अंडर कंट्रोल सटिर्फिकेट’ (पीयूसी) देणारे यंत्र दिले. राज्यातील सुमारे ३५ आरटीओ कार्यालयांना वर्ष २०००मध्ये डिझेल व पेट्रोलवरील वाहनांसाठी प्रत्येकी एक-एक असे ७० पीयूसी यंत्र दिले. त्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये ५० आरटीओ कार्यालयांना पुन्हा डिझेल वाहनांच्या तपासणीसाठी प्रत्येकी एक यंत्र दिले. या यंत्रामुळे राज्यातील काही आरटीओ कार्यालयात ‘पीयूसी’ यंत्राची संख्या तीनवर गेली. यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र जेव्हापासून हे यंत्र आरटीओ कार्यालयात उपलब्ध झाले तेव्हापासून या यंत्राचा वापरच नाही. संबंधित कंपनीकडून यंत्रात वाहनानुसार ‘कॅलिब्रेशन’च करण्यात आले नसल्याने यंत्र सुरूच नाही. वाहन तपासणीच्यावेळी मोटार वाहन निरीक्षक चौकाचौकातील पीयूसी केंद्रावरून काढलेल्या प्रमाणपत्रालाच ग्राह्य मानून योग्यता प्रमाणपत्र देत आहे. विशेष म्हणजे, यातील काही केंद्रातून मिळणारे प्रमाणपत्र वाहने न तपासताच मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.प्राप्त माहितीनुसार, परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना त्यांच्याकडे असलेले ‘पीयूसी’ यंत्र वापरात आहे किंवा नाही तसेच त्याचे ‘कॅलिब्रेशन’ झाले किंवा नाही, असे विचारले आहे. अनेक कार्यालयाने ‘कॅलिब्रेशन’ झाले नसल्याचे कळविले असल्याची माहिती आहे.
निरीक्षकाकडून पीयूसी चाचणी करणे अशक्यचराज्यात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा मोठा भार आरटीओ कार्यालयांवर पडत आहे. त्या तुलनेत कार्यालयात मनुष्यबळाची संख्या अल्प आहे. यातच योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी ‘इन कॅमेरा’ होते. प्रत्येक वाहनाच्या तपासणीचा वेळ ठरवून दिला आहे. या वेळात मोटार वाहन निरीक्षकाने स्वत: पीयूसी चाचणी करणे शक्य नाही. काही कार्यालयांनी त्या स्थितीतही हे यंत्र चालविण्याचा प्रयत्न केला तर काहीमध्ये बॅटरी नसल्याचे आढळून आले.