नागपुरातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या ३.२५ कोटीचे काय झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 08:31 PM2018-01-04T20:31:24+5:302018-01-04T20:33:58+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला विविध वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी २५ लाख रुपयांचे काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनाला केली व यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला विविध वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी २५ लाख रुपयांचे काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनाला केली व यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
यासंदर्भातील जनहित याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या जानेवारीमध्ये शासनाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे १५७ अकुशल कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग केली जाईल असे सांगितले होते. परंतु, त्यापैकी केवळ ८० कर्मचारी भरण्यात आले. तसेच, नवीन इमारतीतील शस्त्रक्रिया विभागात एसी लावण्यात आलेले नाहीत, ही बाब याप्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. अनुप गिल्डा यांनी सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने शासनाला यावरही दोन आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले.
अधिष्ठाता नियुक्तीसाठी बैठक
मेयोमध्ये नियमित अधिष्ठाता नियुक्तीसाठी ११ जानेवारी रोजी बैठक होणार असल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली. सध्या डॉ. अनुराधा श्रीखंडे या प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २७ एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांनी जूनपर्यंत नियमित अधिष्ठात्याची नियुक्ती करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, मेयोला अद्याप नियमित अधिष्ठाता मिळालेला नाही.