लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी वित्त व लेखा विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली असून, विद्यापीठाच्या शेकडो कोटींच्या ठेवी नियमांचे उल्लंघन करत खासगी बँकेत गुंतविण्यात आल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात वित्त व लेखा अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचीदेखील मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी आरोपांचे खंडन करत विधीसभेच्या चौकशी समितीने क्लिन चीट दिल्याचा दावा केला आहे.
२०१८ साली ठेवींची गुंतवणूक करण्यासाठी वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. यात उपकुलसचिव अर्चना भोयर यादेखील होत्या. १७७ कोटींची रक्कम इतर बँकेत गुंतविण्यासाठी कमीत कमी पाच राष्ट्रीयीकृत बँकेकडून व्याजदराचे कोटेशन मागविणे आवश्यक होते. मात्र वित्त व लेखा विभागाकडून चारच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कोटेशन मागविले व एका बँकेला डावलून त्याऐवजी यस बँक या खासगी बँकेकडून कोटेशन मागविले. गुंतवणूक धोरणानुसार राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतवणूक करण्याचे धोरण असतानादेखील समितीने यस बँकेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली ठेवीची मुदत संपल्यानंतर परत कुठलीही प्रक्रिया न राबविता १९१ कोटींची रक्कम परस्पर यस बँकेत गुंतविण्यात आली. रिझर्व्ह बँकेने ५ मार्च २०२० रोजी यस बँकेवर कारवाई केल्यानंतर विद्यापीठाच्या ठेवी अडकण्याचे संकट निर्माण झाले होते. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर विद्यापीठाने १८ मार्च २०२० रोजी ही रक्कम मुदतपूर्व रोखीकृत केली. विद्यापीठाला २०७ ऐवजी २०१ कोटी रुपये मिळाले व विद्यापीठाचे ५ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप डॉ. पूरण मेश्राम यांनी केला.
कुठलाही गैरव्यवहार व नुकसान नाही : हिवसे
यासंदर्भात डॉ. राजू हिवसे यांना संपर्क केला असता त्यांनी कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले. नियमांत जे होते त्यानुसारच प्रक्रिया करून विद्यापीठाच्या ठेवी गुंतविण्यात आल्या होत्या. विधीसभेची त्यावर समितीदेखील लागली होती व समितीने सखोल चौकशी केली होती. विद्यापीठाचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचा तसेच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा अहवाल संबंधित समितीने दिला होता. पाच वर्षांच्या कारकिर्दीत कुठलाही गैरप्रकार झाला नाही. माझ्यावर तसेच विभागावर होत असलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे डॉ. हिवसे यांनी सांगितले.