लोकमत न्युज नेटवर्क
नागपूर :ज्या कारणांचा हवाला देत मला पक्षातून निष्कासित करण्यात आले याचा आधी पुरावा द्या. मी कोणत्याही काँग्रेस बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे त्यांचा नेता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी रविवारी केला.प्रदेश कॉँग्रेसने दोन दिवसांपूर्वी पक्षातून निष्कासित केल्यानंतर चतुर्वेदी यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर व मुंबईतील मूठभर नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थ व जातीयवादी शक्तींना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले आहे. या वादात काँग्रेसचा गड उद्ध्वस्त होतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पक्षातून गेलेले नेते आणि कार्यकर्त्यांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न होत असताना प्रदेश कॉँग्रेसने माझ्यावर कारवाई करून नेमके काय साधले, असा सवालही चतुर्वेदी यांनी केला. पक्षातून निष्कासित करण्यात आल्याचे प्रदेश काँग्रेसचे कुठलेही पत्र मिळाले नाही. त्यामुळे मी ५२ वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नागपुरात यापूर्वीही प्रतिस्पर्धी आणि बंडखोरांना अनेक नेत्यांनी बळ दिले आहे. त्यामुळेच पश्चिम, पूर्व आणि उत्तर नागपूरसारखे काँग्रेसचे मजबूत किल्ले निवडणुकात ढासळले. त्यावेळी कुणी कुणाला मदत केली, याची सर्वांना कल्पना आहे. ज्यांना पक्षांकडून काहीच नको आहे, त्यांना पक्षातून काढून काहीही उपयोग होणार नाही. मी बंडखोरांचे समर्थन केल्याची कोेणतीही नोटीस अजूनही प्रदेश काँग्रेसने पाठविलेली नाही. त्यामुळे एकहाती कारभार असलेल्या शहर काँग्रेसच्या अहवालावर मला पक्षातून निष्कासित करण्यात आल्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे नैसर्गिक न्याय मागणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आमदार अशोक धवड यावेळी उपस्थित होते.