अल्पवयीनांना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 07:04 PM2018-01-24T19:04:20+5:302018-01-24T19:06:20+5:30
अल्पवयीन मुलामुलींना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला विचारला व विशेष उप-समितीच्या बैठकीत यावर विचारमंथन करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलामुलींना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला विचारला व विशेष उप-समितीच्या बैठकीत यावर विचारमंथन करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
वाहतुकीसंदर्भातील प्रश्नांबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची ३ फेब्रुवारी रोजी बैठक आहे. गेल्या १९ जानेवारी रोजी हिस्लॉप महाविद्यालयापुढे अपघात होऊन चिन्मय भास्करे (१६) या अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो १२५ सीसीची स्कू टर चालवीत होता. तो सिव्हिल लाईन्स येथील भवन्स शाळेचा विद्यार्थी होता. न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी या घटनेचे उदाहरण देऊन, न्यायालयात विविध सूचनांचा अर्ज दाखल केला. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग संचालकांनी वेगवान वाहने घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात प्रवेश देऊ नये, अशी एक सूचना त्यांनी अर्जात केली आहे. न्यायालयाने ही सूचना लक्षात घेता भवन्स शाळेला नोटीस बजावून यावर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.
त्या अहवालाची दखल
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी अहवाल तयार केला आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर, न्यायालयाने या अहवालाचाही अभ्यास करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विशेष उप-समितीला दिले.