जलालखेडा : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातावर पोट भरणारे नागरिक आहेत. छोटासा व्यवसाय रस्त्याच्या कडेला मांडून उदरनिर्वाह ही मंडळी करत असतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्याचा रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांनी करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या व्यावसायिकांविषयी विचार करावा व त्यांना काही तास व्यवसाय सुरू करायला मुभा द्यावी किंवा त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी हे व्यावसायिक करत आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे थंड पाणी पिण्यासाठी ग्रामीण भागात मडक्यांना मागणी वाढते. उन्हाळा लक्षात घेता कुंभार समाजातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात मडकी बनवून ठेवलेली आहेत. परंतु शासकीय निर्बंधांमुळे रस्त्याच्या कडेला बसून या मडकी विकणाऱ्या व्यावसायिकाला विक्री करता येत नाही. तसेच पावसाळा दोन महिन्यावर आल्याने शेतकरी शेतीतील अवजारे तयार करून ठेवतात. त्यासाठी लोहार समाज बांधव गावोगावी जाऊन व्यवसाय मांडतात. शेतकरी त्यांच्याकडून शेतीविषय अवजारे तयार करतात. पण लोहार समाजातील कारागिरांनाही लॉकडाऊनचा फटका बसतो आहे. लॉकडाऊनमुळे अनेक औद्योगिक कंपन्या, कारखाने बंद आहेत. त्यामुळे असंख्य मजुरांच्या हातचे काम गेले. व्यावसायिकांचे व्यवसाय मोडकळीस आले आहेत..
रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांनी जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:09 AM