लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात तरुण विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी ‘पदविका’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाला ‘स्टायपेंड’देखील देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. परंतु विद्यापीठाच्या या संकल्पनेवर राष्ट्रसंतांच्या अनुयायांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अगोदरच येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असताना त्याला मजबूत करण्याऐवजी नवीन अभ्यासक्रम आणणे अयोग्य आहे. पदविकेतून राष्ट्रसंतांचे विचार विद्यार्थ्यांना नेमके कितपत समजतील, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.अध्यासन सुरू झाल्यानंतर येथे सुरुवातीला विद्यार्थीच मिळत नव्हते. अखेर या अध्यासनाबाबत प्रचार-प्रसार केल्यानंतर विद्यार्थी मिळण्यास सुरवात झाली. गेल्या दोन वर्षांपासून तर चांगल्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. मात्र यात तरुण विद्यार्थ्यांची संख्या हवी तेवढी नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित ज्येष्ठ किंवा वयाने मोठे असलेल्या नागरिकांनी येथे प्रवेश घेतले आहेत. त्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावेत यासाठी विशेष शिष्यवृत्ती ‘पॅटर्न’ राबविण्याचे कुलगुरूंनी सांगितले होते. यासंदर्भात मागील महिन्यात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंथन झाले. या विभागात सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हा रोजगाराभिमुख नाही. त्यामुळे याकडे तरुणांची पावले वळत नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला व समाजाला आवश्यकता आहे. याकडे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावे व त्यांचे विचार आत्मसात करावे, या उद्देशातून येथे तरुणांच्या सोयीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, अशी सूचना व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत देण्यात आली होती. यासंदर्भात विभागप्रमुख डॉ.प्रदीप विटाळकर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून कुलगुरूंनी यासंदर्भात त्यांच्याकडून प्रस्ताव मागविला आहे.विद्यापीठाच्या या संकल्पनेला राष्ट्रसंतांच्या अनुयायांनी विरोध केला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमातून राष्ट्रसंतांचे विचार सखोल पद्धतीने समजतील, अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला अगोदर प्रशासकीय अनास्थेचा सामना करावा लागला. आता येथे विद्यार्थी आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. येथील विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू केले पाहिजे. परंतु त्याऐवजी पदविका अभ्यासक्रम आणणे हे संशयास्पद आहे. जुन्या अभ्यासक्रमाला खिळखिळा करण्याचेच हे प्रयत्न आहेत का, असा प्रश्न श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक व अभ्यासमंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांनी उपस्थित केला.
‘पदविका’ अभ्यासक्रमाने किती समजतील राष्ट्रसंत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 9:40 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात तरुण विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी ‘पदविका’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
ठळक मुद्देपदव्युत्तर अभ्यासक्रमालाचा मजबूत करा : राष्ट्रसंतांच्या अनुयायांची मागणी