अग्निशमन जवानांना प्रशिक्षणाची गरज : पुलगावच्या घटनेतून धडा घ्यावानागपूर : पुलगाव येथील संरक्षण विभागाच्या दारुगोळा भांडाराला लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाच्या मर्यादा व त्रुटी पुढे आल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील जवानांना स्फोटकामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे वेळप्रसंगी स्फोटकांमुळे शहरात आग लागल्यास ती आटोक्यात कशी आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांना स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण दिले जात नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी बुधवारी दिली. स्फोटकांविषयी अग्निशमन विभागाच्या जवानांना फारशी माहिती नसते. त्यामुळे यापासून लागलेली आग आटोक्यात आणणे धोकादायक असते. काही स्फोटके पाणी टाकल्यास अधिक पेट घेतात. त्याचा स्फोट होतो. याची माहिती कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे.पुलगाव येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या संरक्षण विभागाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांना महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आदरांजली वाहण्यात आली. कोणत्याही विभागाच्या अग्निशमन विभागाचे जवान असले तरी इतर विभागाच्या अग्निशमन विभागाला त्यांच्याविषयी आत्मीयता असते. संरक्षण विभागाच्या अग्निशमन विभागातील जवानांनी स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण घेतले असतानाही १६ जवान शहीद झाले. या घटनेतून धडा घेण्याची गरज असल्याचे उचके म्हणाले. पुलगाव येथील दारुगोळा भांडारात स्फोटके विशिष्ट पद्धतीने ठेवली जातात. वेगवेगळ्या आठ शेडमध्ये ती ठेवण्यात आली होती. यातील एका शेडला आग लागली. धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने अग्निशमन विभागाचे जवान तेथे पोहचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की त्यांचे मृतदेह मिळाले नाही. परंतु त्यांच्या शौर्यामुळे इतर सहा शेडमधील दारुगोळा सुरक्षित राहिला. मोठ्या वाहनांतून धोकादायक स्फोटके वाहून नेली जातात. अशा वाहनांना आग लागल्यास ती आटोक्यात आणता आली पाहिजे. परंतु चालक व वाहकाला याचे प्रशिक्षण नसते. हा प्रकार गंभीर आहे. नागपूर शहरालगतच्या बाजारगाव परिसरात फटाके बनविण्याचे कारखाने आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहेत. (प्रतिनिधी)फायरमन व लिडिंग फायरमन प्रशिक्षितस्फाटोमुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. यासाठी सब आॅफिसर अभ्यासक्रम करणे आवश्यक असते. महापालिकेतील ६० कर्मचारी प्रशिक्षित आहेत. चार जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. विभागात ४११ मंजूर पदापैकी २४८ कर्मचारी कार्यरत असून इतर पदे रिक्त आहेत. फायरमन व लिडिंग फायरमन पुलगावसारख्या घटना आटोक्यात आणू शकतात, अशी माहिती उचके यांनी दिली. ग्रीन जीम सुरू करणार अग्निशमन विभागातील जवानांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जीम स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. परंतु क्रीडा विभागाने पैसे खर्च करण्यास नकार दिल्याने तो रखडला. आता अग्निशमन विभागाने कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन जीम उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अग्निशमन कायद्यात लवकरच बदलमहाराष्ट्र अग्निशमन सेवा कायदा व सामान्य सेवा कायद्यातील तरतुदीत अनेक बदल प्रस्तावित आहेत. या संदर्भात लवकरच नगरविकास विभागाचे मंत्री व अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. प्राप्त सूचनानुसार बदल केल जाणार आहे. हा प्रस्ताव विधिमंडळात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
स्फोटाची आग आटोक्यात कशी आणणार?
By admin | Published: June 02, 2016 3:19 AM