योजनांचा खेळखोळंबा : एनईएसलची बैठकीत सदस्य संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना २४ तास पाणी मिळावे. यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामांसाठी ४२३.८३ कोटी रुपयांच्या खर्चाला नागपूर एन्व्हायरमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने (एनईएसएल) मंजुरी दिली. परंतु मागील दोन वर्षात फक्त ६.८९ टक्के अर्थात २९.२३ कोटी रुपयांची कामे करण्यात आली.
दोन वर्षात सतरंजीपुरा, गांधीबाग, लकडगंज, आसीनगर झोन क्षेत्रात येणाऱ्या भागातील जुनी पाइपलाइन बदलण्याच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. अधिकाऱ्यांनी यासाठी कोविड संक्रमणाचे कारण पुढे केले आहे, तर विभागाच्या कार्यपद्धतीवर एनईएसएलच्या नवीन व्यवस्थापकीय निदेशकांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनईएसएल गठित करण्यात आली आहे. सदस्यांत मनपातील पदाधिकाऱ्यांसह विरोधी पक्षातील सदस्य व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई आदींना निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बैठकीत २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावर चर्चा झाली. कामाच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणले. शहरातील काही भागांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. याकडे पाणीपुरवठा विभागाचे लक्ष नाही. जुन्या पाइनलाइन बदलण्याचे काम दोन वर्षापासून ठप्प आहे. यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी थांबलेली सुरू करण्याचे निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार विविध झोनमधील पाइपलाइन बदलणे, देखभाल व लिकेज दुरुस्ती आदी कामांसाठी ४३५.८१ कोटी रुपयांचे २१ प्रस्ताव ठेवण्यात आले. यातील एनईएसएलच्या ४२३.८३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० व २०२०-२१ या वर्षातील कामाचा समावेश आहे. मात्र गेल्या दोन वर्षात यातील २८.१० कोटी रुपयांची कामे करण्यात आली. याशिवाय २८.१० कोटी रुपयाची कामे प्रगतिपथावर आहेत तर ३६९.२५ कोटीची कामे अजूनही सुरू झालेली नाही.
काचीमेट, बिनाकी, जरीपटका, कपिलनगर, नारी गाव येथील कामे पूर्ण झाली तर आसीनगर झोनमधील १५१.४९ कोटींपैकी फक्त ३.०५ कोटींची कामे करण्यात आली. मीटर बदलणे, व्हॉल्व्ह चेंबर बदलणे, ईएमए बदलण्याचे काम अर्धेही झालेली नाही.
...
सतरंजीपुरा, गांधीबागमधील कामे ठप्प
सतरंजीपुरा, गांधीबाग झोनमधील पाइपलाइन बदलण्याचे काम ठप्प आहे. सतरंजीपुरा झोनमधील ११०.८३ कोटी, गांधीबाग झोनमध्ये ९८.४२, नंदनवन येथे २१.२३ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. परंतु या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. लकडगंज झोनमधील ३.१३ कोटीपैकी ०.८० कोटीचेच काम करण्यात आले. भांडेवाडी, चंदननगर, गांजाखेत चौक येथील पाइपलाइन बदलण्याचे काम अजूनही मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.