लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय हरीत लवादाकडून (एनजीटी) दाेन वर्षांपासून नायलाॅन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. असे असताना या जीवघेण्या मांजाची सर्रासपणे खरेदी - विक्री हाेतेच कशी, असे खडेबाेल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन व इतर संस्थांना सुनावले. नायलाॅन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत काेणते पाऊल उचलले आहेत, असा थेट सवाल करीत सरकार व स्थानिक संस्थांना नाेटीस बजावली आहे. सरकारने दाेन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पतंगबाजीसाठी माेठ्या प्रमाणात नायलाॅन मांजाचा वापर हाेत असल्याने जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. नागपूरच्या इमामवाडा परिसरात २१ वर्षीय प्रणय प्रकाश ठाकरे या तरुणाचा नायलाॅन मांजामुळे गळा चिरल्याने नुकताच मृत्यू झाला. यानंतर काहीच वेळात मानेवाडा भागात साैरभ पाटणकर हा २२ वर्षीय तरुण या मांजामुळे गंभीर जखमी झाला. डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारे एका शाळकरी मुलाला मांजामुळे गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. केवळ माणसेच नाहीत तर पशु-पक्ष्यांनाही मारक ठरला असून, दरवर्षी शेकडाे पक्षी मांजात अडकून जीव गमावतात. याबाबत गंभीर दखल घेत राज्यात नायलाॅन मांजावर प्रतिबंधही लावण्यात आले. मात्र, अंमलबजावणीअभावी मांजाची खुलेआम विक्री आणि खरेदी हाेत आहे. यावर न्यायालयाने स्वत: सू-माेटाे जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करताना न्यायालयाने राज्य शासन आणि महापालिकांसारख्या संस्थांना धारेवर धरले. प्रतिबंध असताना नायलाॅन मांजाची सर्रासपणे विक्री हाेतेच कशी, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. सरकारने प्रतिबंध कायम राहण्यासाठी काय उपाययाेजना केल्या, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात ड. देवेन चाैहान यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.