लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे व फरार असलेल्या किती आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली आणि यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आरोपी फरार असल्यामुळे राज्यातील विविध न्यायालयांमध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. त्यासंदर्भातील आकडेवारी लक्षात घेता न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेची व्याप्ती वरील पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. ३ वर्षे व त्यापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील जे खटले आरोपी फरार असल्यामुळे १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत त्यांचा या याचिकेत विचार केला जात आहे.सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, आरोपी फरार असल्यामुळे नागपूर शहरातील ३३४९ तर, नागपूर ग्रामीणमधील ४१७ खटले प्रलंबित आहेत. आतापर्यंत या खटल्यांतील सुमारे ८०० फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरामधील १९४० खटल्यांतील आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट तर, ११६८ खटल्यांतील आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आले होते. तसेच, उर्वरित २४१ खटल्यांतील आरोपींविरुद्ध घोषणापत्र जारी करण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
प्रलंबित खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला : हायकोर्टाची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 8:01 PM
नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली.
ठळक मुद्देसरकारला मागितला अहवाल