- लोकमत इम्पॅक्ट
(३ ऑगस्ट रोजी लोकमत हॅलोमध्ये ‘कोरोनाचा धोका वाढल्यावरच सिरो सर्वेक्षण करणार का?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कोलाज वापरावे.)
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरली. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी किती नागरिकांमध्ये त्यांच्या नकळत कोरोना होऊन गेला याची तपासणी म्हणजे, ‘सिरो सर्वेक्षण’ होणे महत्त्वाचे होते. अखेर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाचा निर्णय घेत मेडिकलकडे जबाबदारी दिली.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ३ ऑगस्ट रोजी कोरोनाचा धोका वाढल्यावरच सिरो सर्वेक्षण करणार का? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
आरोग्य कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना आरोग्य भारतीय वैद्यक संशोधन परिषदेबरोबर (आयसीएमआर) विचारविनिमय करून आपापल्या राज्यात सिरो सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला होता. अशा सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय डेटा तयार करण्याचाही सूचना आहेत. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील ‘सिरो सर्वेक्षण’ ५८ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाल्याचे आढळून आले. यामुळे नागपूर जिल्ह्याचे सिरो सर्वेक्षण महत्त्वाचे ठरले होते. विशेष म्हणजे, जानेवारी ते जुलै यादरम्यान तब्बल ३ लाख ६९ हजार ११८ रुग्ण आढळून आले. शिवाय, शहरात सुरू असलेल्या लहान मुलांमधील कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीत २ ते १८ वयोगटातील १०० मुलांमधून १८ मुलांच्या (१८ टक्के ) शरीरात प्रतिपिंडाची (अँटिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या पहिल्या सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अँँटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. यामुळे आता दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- लवकरच सिरो सर्वेक्षण
दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोना न होता किती लोकांमध्ये अँटिबॉडीज निर्मिती झाली, हे दिसून येईल. याचा फायदा तिसऱ्या लाटेचे नियोजन करताना होईल. लवकरच हे सिरो सर्वेक्षण होणार आहे.
- प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय आयुक्त
- जास्तीतजास्त लोकांचे सर्वेक्षण
पहिल्या सिरो सर्वेक्षणात चार हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या सर्वेक्षणात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा विचार आहे. साधारणत: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वेक्षण सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. उदय नार्लावार, प्रमुख पीएसएम विभाग, मेडिकल