आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:27 PM2020-08-24T22:27:40+5:302020-08-24T22:28:38+5:30
गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता व धर्मदास बागडे यांनी कोरोनाशी संबंधित विविध मागण्यांसह जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाईनमधील रुग्णांना रोज ५०० रुपये देण्यात यावे, नागपूरमध्ये प्रत्येकी ५०० खाटा व आधुनिक आरोग्य सुविधांसह दोन रुग्णालये बांधण्यात यावी, जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर आवश्यक रुग्णालये बांधण्यात यावीत, हे काम तीन वर्षात पूर्ण करण्यात यावे आणि तोपर्यंत नागरिकांकडून कर वसूल करण्यात येऊ नये, अशा याचिकाकर्त्यांच्या मागण्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सी. पी. चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.
खाटा अनुपलब्धतेवर जनहित याचिका
उच्च न्यायालयाने कोरोनाबाधित व्यक्तींना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध केल्या जात नसल्याच्या बातमीची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. सदर याचिकेवर २ सप्टेंबर रोजी दत्ता व बागडे यांच्या याचिकेसोबत सुनावणी होईल.