सावनेर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यूदर सर्वाधिक सावनेर तालुक्यात आहे. येथे गावागावात बाधितांचा ग्राफ वाढ असताना आणि उपचारासाठी रुग्णांची भटकंती सुरू असताना कोविड सेंटर सुरू करण्यासाठी इतका विलंब का लागतो, असा सवाल केला जात आहे.
तालुक्यात १ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ७,७९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. या मार्च महिन्यात आतापर्यंत ३,८४२ नागरिक बाधित झाले. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. असे असताना सावनेर शहरात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाला जागेची अडचण असल्याचे कारण प्रारंभी पुढे करण्यात आल्याची माहिती आहे. गतवर्षी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. आता आयटीआयमध्ये निवासी विद्यार्थी होते. त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. त्यामुळे ही जागा उपलब्ध झाली नाही, असे दाखले प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. मात्र कोविड सेंटरसाठी याच जागेचा आग्रह न धरता स्थानिक प्रशासनाने तातडीने पर्यायी जागेचा शोध घेणे गरजेचे होते. मात्र तशा कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाही. यासंदर्भात शासकीय रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. पवन मेश्राम यांना विचारणा केली असता, १ एप्रिलपासून सावनेरमध्ये कोविड केअर सेंटर होणार असल्याचे सांगितले. तहसीलदार राहुल सारंग यांनी यास दुजोरा दिला. मात्र आयटीआयचे प्राचार्य प्रदीप लोणारे यांनी याबाबत लेखी पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. तोंडी सूचनेनुसार होस्टेलच्या १६ पैकी १३ रुम रिकाम्या करून ठेवल्याचे लोणारे यांनी सांगितले. सध्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा सुरू आहे. यात दररोज १० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासोबतच कोविड टेस्टिंग सेंटरही याच संस्थेत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे एकूणच प्रशासकीय अनास्था विचारात घेता सावनेर तालुक्यातील नागरिकांना कोविडचा मुकाबला करण्यासाठी अधिक आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया समाजमनात उमटताना दिसत आहेत.