काटोल : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा घरीच जीव जातोय. अशात काटोल येथील श्री सती अनसूया माता देवस्थान येथे विलगीकरण केंद्र सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने हात आखडता घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे काटोलचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढल्यानंतर या केंद्राला मान्यता देतील का, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक विचारत आहेत.
काटोल तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता श्री अनसूया माता देवस्थानच्या वतीने मंदिराच्या एका सभागृहात बाधित रुग्णांसाठी ८५ बेडची व्यवस्था केली. येथे विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला, मात्र याला अद्यापही मंजुरी मिळाली नाही.
ग्रामीण भागात गृहविलगीकरण केवळ नावापुरते आहे. तालुक्यात असे अनेक बाधित रुग्ण आहेत की ज्यांचा संसार केवळ एक किंवा दोन खोल्यात चालतो. काही बाधित रुग्ण तर झोपडपट्टीत राहतात. मग असे रुग्ण त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि गावातील नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने संक्रमण वाढेल की कमी होईल, असा प्रश्न आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधीपुढे योग्य नियोजनाच्या थापा मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कसा पडत नाही? जोवर ज्यांच्या घरी स्वतंत्र विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशा रुग्णांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले जाणार नाही, तोवर तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडित होणार नाही, हे येथील अधिकाऱ्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. अन्यथा काटोल तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्या अशीच वाढत गेल्यास यावर नियंत्रण मिळविणे कठीण होईल.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यात रुग्णसंख्या अधिक होती. त्यावेळी शहरात व ग्रामीण भागात विलगीकरण केंद्र उभारण्यात आले होते. यात पारडसिंगा देवस्थानच्या इमारतीचासुद्धा समावेश होता. यावेळी कोरोनाने थैमान घातले आहे. तालुक्यात विलगीकरण केंद्राची संख्या कमी असल्याने ९० टक्के रुग्ण घरीच आहेत. ते गावात कोरोना स्प्रेडरची भूमिका वठवीत आहेत, हे येथील अधिकाऱ्यांना दिसत नाही का?
गृहविलगीकरण केवळ नावापुरतेच
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमुख कारण गृहविलगीकरण आहे. ज्यांच्या घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही, त्यांच्यापासून अख्खे कुटुंब बाधीत होत आहे.
--
संस्थांच्या माध्यमातून ८५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास या सेंटरवर ऑक्सिजन पुरविणे व डॉक्टरची व्यवस्था करण्याचा मानस आहे. परंतु विलगीकरण केंद्र म्हणून परवानगी दिल्या जात नसल्याने आम्ही हतबल आहोत.
चरणसिंग ठाकूर
अध्यक्ष, श्री सती अनसूया देवस्थान, पारडसिंगा