लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शहीद चौक येथे सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाना पटोले हे एका पक्षाकडून निवडणूक लढतात, मग तीन वर्षांनी त्याच पक्षावर टीका करत दुसरीकडे प्रवेश करतात. त्यानंतर परत तोच क्रम सुरू असतो. इतके वेळा आमदार आणि खासदार राहूनदेखील त्यांनी विकास केला नाही. नितीन गडकरी यांनी नागपूरचा कायापालट केला. याअगोदर ज्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने दिल्लीत पाठविले व मंत्रिपद मिळवून दिले. त्यांनी दिल्लीत केवळ पक्षश्रेष्ठींसमोर ‘मुजरा’च घालत जीहुजूरी केली व त्यातच धन्यता मानली. काँग्रेसमुळेच भ्रष्टाचाराची परंपरा सुरू झाली. मतांच्या राजकारणामुळे काँग्रेसचे नेते देशाला विसरले आहेत. म्हणूनच काँग्रेसने जाहीरनाम्यात जम्मू-काश्मिरातील सैन्य परत घेऊ, सैन्यांचे विशेष अधिकार काढून टाकू, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे कलम १२४ (अ) काढून टाकू, असा उल्लेख केला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कुठलीही ठोस कारवाई केली नाही. अगोदरच्या पंतप्रधानांनी कणाहीन असल्यासारखी भूमिका घेतली होती. यंदाची निवडणूक ही विकासासोबतच देशाच्या अस्मितेचीदेखील आहे, असे ते म्हणाले. यावेळी आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रवीण दटके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, शिवसेनेचे मंगेश कडव, गजेंद्र पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.दोन वर्षांत गोसेखुर्द पूर्ण होणारमी लहानपणापासून गोसेखुर्द प्रकल्पाचे नाव ऐकत होतो. मात्र २०१४ पर्यंत त्याचे संथगतीने काम सुरू होते. २०१४ साली या प्रकल्पामुळे ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. सध्या हे प्रमाण ५८ हजार हेक्टर इतके असून, पुढील वर्षी १ लाख हेक्टर सिंचनक्षेत्र यामुळे निर्माण होईल. पुढील दोन वर्षांत गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.