नागपूर - जो कुणी भाडेकरू ठेवला, त्याची कागदोपत्री माहिती घरमालकाने महापालिका किंवा पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक आहे. भाडेकरूच्या रुपात कोणत्या गुन्हेगाराने आश्रय घेऊ नये किंवा तेथून त्याने कोणते घातपाती कृत करू नये, हा यामागचा हेतू आहे. मात्र, बहुतांश घरमालक ना पालिकेकडे, ना पोलिसांकडे त्यांच्या भाडेकरूची माहिती देतात. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांकडे त्याची माहिती उपलब्ध नाही. हा मुद्दा भविष्यात खूप मोठा धोका निर्माण करणारा ठरू शकतो.
शहराची लोकसंख्या ३५ लाखांवर
नागपूरची लोकसंख्या ३५ लाखांवर आहे. शहराचा विकास अन् विस्तारिकरणही झपाट्याने होत आहे. त्यामुळे नियमित लोकसंख्येचा आकडा वाढतो आहे.
मालमत्ताधारकांची संख्या सहा लाखांवर
पालिकेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उपराजधानीतील मालमत्ता धारकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. शहरालगतच्या भागात झपाट्याने वस्त्या वाढत आहे.
हे दूर्लक्ष ठरू शकते घातक
महापालिकेचे अधिकारी म्हणतात आमच्याकडे भाडेकरूंची माहिती नाही अन् पोलीस अधिकाऱ्यांकडूनही हीच माहिती मिळते. विशेष म्हणजे, भाडेकरू ठेवणाऱ्या घरमालकाने तशी माहिती महापालिका आणि पोलिसांना देणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे फारसे कुणी गांभिर्याने बघत नाही. त्यामुळे ना पालिकेच्या अधिकाऱ्याची ना पोलीस अधिकाऱ्यांची त्याची माहिती आहे. मात्र, ही अनास्था भविष्यात मोठा धोका निर्माण करण्याची भीती आहे.
थोडक्यात निभावले
आपण आपले घर, सदनिका ज्यांना भाड्याने दिली, ते कोण, काय करतात, त्याची पुरेशी माहिती घेतली नसल्याने आणि त्यांच्या वर्तनाकडे लक्ष न दिल्याने अनेक घरमालक आतापर्यंत अडचणीत आले आहे. सुदैवाने कोणता मोठा दहशतवादी किंवा गुन्हेगार काही धोका करून गेला नाही. मात्र, नागपुरात भाड्याने राहून नंतर पळून गेलेला एक आरोपी तालिबानी निघाला आहे.
चक्क कुंटनखानाच सुरू केला
ब्युटी पार्लर, स्पा मसाज सेंटर, नॅचरोपॅथी सेंटरच्या नावाखाली घरमालकाकडून भाड्याने सदनिका किंवा घर घेणाऱ्या काही महिला-पुरुषांनी तेथे चक्क कुंटनखाना सुरू केला. नागपूरच नव्हे तर ठिकठिकाणच्या वेश्यांना बोलवून तेथे ते त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊ लागले. मनीषनगर, सदर, बेसा, बेलतरोडी, पारडी, वाठोडासह अनेक भागात असे प्रकार यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उघड झाले आहेत. त्यामुळे नाहकच घरमालकांना पोलिसांच्या कारवाईचा सामनाही करावा लागला आहे.
-----