नागपूर विद्यापीठात प्राध्यापकाची किती पदे रिक्त : हायकोर्टाने मागितली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 10:37 PM2019-07-31T22:37:34+5:302019-07-31T22:38:25+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये प्राध्यापकाची किती पदे रिक्त आहेत व किती अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश विद्यापीठाला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये प्राध्यापकाची किती पदे रिक्त आहेत व किती अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश विद्यापीठाला दिला.
नियमित प्राध्यापक नसल्याने बीसीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमात विद्यार्थी प्रवेशास मनाई करण्यात आल्यामुळे वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वरील विचारणा केली. संस्थेच्या महाविद्यालयात २००२ पासून बीसीए अभ्यासक्रम शिकविला जात आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पात्र अंशकालीन प्राध्यापकांची नियुक्ती केली जात होती. विद्यापीठ त्याला मान्यता देत होते. परंतु, यावर्षी नियमित प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक असल्याचे सांगून प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. त्यावर संस्थेचा आक्षेप आहे.