लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे नेमके प्रत्यक्ष काम किती झाले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गोसेखुर्द प्रकल्प मंडळाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार गोसेखुर्द प्रकल्पाचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ४० टक्के काम अपूर्ण आहे. मात्र केंद्रीय जलसंपदा, नदी विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मात्र वेगळीच माहिती आहे. संकेतस्थळावर प्रत्येक सिंचन प्रकल्पाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. गोसेखुर्दचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत झाला असून त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. संकेतस्थळानुसार गोसेखुर्दचे प्रत्यक्ष काम हे ६७.०१ टक्के इतके झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्प मंडळ व मंत्रालयाच्या आकडेवारीत थोडीथोडकी नव्हे तर सात टक्क्यांची तफावत आहे. त्यामुळे नेमका आकडा काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, सुरुवातीला प्रकल्पाच्या उभारणीची अंदाजित किंमत ३७२ कोटी इतकी होती. आता ती १८ हजार कोटींहून अधिक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या कामासाठी ११ हजार ८५ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला.काम कधी सुरू झाले?गोसेखुर्द प्रकल्प मंडळातर्फे आकडेवारीत आणखी एक घोळ करण्यात आला आहे. ७ जानेवारी २०१६ रोजी मंडळाने माहितीच्या अधिकारात प्रकल्पाचे काम हे १ फेब्रुवारी १९८१ रोजी सुरू झाल्याचे नमूद केले होते. तर १ जानेवारी २०१९ रोजीच्या माहिती अधिकाराच्या उत्तरात गोसेखुर्दचे काम ३१ मार्च १९८३ रोजी सुरू झाल्याचा उल्लेख आहे. एकाच मंडळाच्या एकाच मुद्यावरील माहितीत तारीख वेगवेगळी कशी असू शकते हे एक कोडेच आहे.
‘गोसेखुर्द’चे नेमके काम झाले तरी किती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 8:22 PM
गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे नेमके प्रत्यक्ष काम किती झाले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देमंत्रालय आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकडेवारीत तफावत : गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचा आकडा सात टक्क्यांनी कमी