नागपूर : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांनी हवा तसा वेग घेतलेला नाही. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी ७५ हून अधिक निकाल जाहीर झाल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात संकेतस्थळावर मात्र २८ परीक्षांचेच निकाल दाखविण्यात येत आहेत. ‘ई-रिफॉर्म्स’च्या काळात विद्यापीठात ‘आॅनलाईन’ सुधारणांचे वारे वाहत आहेत. परंतु प्रत्यक्षात संकेतस्थळ मात्र नियमित ‘अपडेट’ होत नसल्याचे दिसून येत आहे. हीच का ‘ई’ सुधारणा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल व पहिल्या टप्प्याचे निकाल नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जाहीर करण्यात येतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु अनेक परीक्षा आटोपून ४५ दिवस उलटून गेले असूनदेखील विद्यार्थ्यांना निकालांची प्रतीक्षाच आहे.अनेक परीक्षांचे निकाल हे ‘डेटा ट्रान्सफर’मध्ये अडथळे आल्यामुळे खोळंबले होते. बहि:शाल विद्यार्थी, तसेच अगोदर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य तऱ्हेने विद्यापीठापर्यंत पोहोचली नाही. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे नामांकन क्रमांक भरले होते. त्यामुळे निकालाशी संबंधित ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक ‘एरर’ दाखविण्यात येत होता.मागील आठवड्यात एकूण ७० हून अधिक परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात यश आले होते, अशी माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात संकेतस्थळावर मात्र केवळ २८ निकाल जाहीर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमके निकाल लागले तरी किती, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थी संभ्रमातपहिल्या टप्प्यातील अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनादेखील असेच सांगण्यात आले. परंतु संकेतस्थळावरील निकालांच्या यादीत परीक्षेचे नाव नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे. जर संकेतस्थळच ‘अपडेट’ झाले नाही तर कुठल्या परीक्षेचा निकाल लागला हे कळणार तरी कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नेमके निकाल लागले तरी किती ?
By admin | Published: January 11, 2016 2:39 AM