लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना ठोक बाजारात आणि कॉटन मार्केट उपबाजारातभाज्यांच्या किमती आटोक्यात असल्या तरीही किरकोळ बाजारात दुपटीपेक्षा जास्त भावात भाज्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले. जास्त भावाचा गरीब व सर्वसामान्यांना फटका बसतो. महागाईच्या काळात सर्वच वस्तू महाग झाल्याची झळ लोकांना बसत असून, आता स्वयंपाकघरातील भाज्याही महाग झाल्या आहेत.
खरिपाची पेरणी आणि मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढतात, असा सर्वांनाच अनुभव आहे; पण यंदा सर्वत्र मुसळधार पावसामुळे भाज्यांचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतून नागपुरात भाज्यांची आवक कमीच आहे. किरकोळमध्ये सर्वच भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. गुरुवारी ठोक बाजारात कोथिंबीर ८० रुपये किलो, तर किरकोळमध्ये १२० रुपये किलो दराने विक्री झाली. याशिवाय पावसामुळे आवक कमी असल्याने लसणाची फोडणी महागली आहे. ठोक बाजारात चांगल्या दर्जाचे बटाटे १० ते १२ रुपये किलो असताना किरकोळमध्ये ३० रुपये भावात विक्री होत आहे. टोमॅटोसुद्धा ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोमवारी क्वाॅर्टर बाजारातील भाजी विक्रेते सदानंद तरार म्हणाले, सध्या पावसामुळे आवक कमी असल्याने ठोक बाजारातसुद्धा भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्या रोखीत खरेदी कराव्या लागतात. विक्रीसाठी आणलेल्या भाज्या एकाच दिवशी विकल्या जात नाहीत. त्यातील २० टक्के भाज्या खराब होतात. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट असतात.
हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर)
भाजीपाला कळमना बाजार घराजवळ
वांगे ४० ६०
कोथिंबीर ८० १२०
मिरची ३० ६०
टोमॅटो २५ ५०
फूलकोबी २५ ५०
पत्ताकोबी १५ ४०
ढेमसे ३० ६०
बटाटे १२ ३०
पालक ३० ६०
भेंडी २५ ५०
सर्वच बाजारपेठांत वेगवेगळे भाव
शहरातील दोन ठोक बाजारांत भाज्यांचे भाव आटोक्यात असले तरीही शहरातील विविध किरकोळ बाजारात भाव वेगवेगळे आहेत. वाहतुकीचा खर्च जोडून भाज्यांची विक्री करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नंदनवन बाजारात पालक ६० रुपये किलो तर धरमपेठ बाजारात ८० रुपये किलो आहे. सोमवारी क्वाॅर्टरमध्ये टोमॅटो ५० रुपये, महालमध्ये ४० रुपये, रमणा मारुती ४० रुपये, तर धरमपेठ बाजारात ६० रुपये भाव आहे. याशिवाय उमरेड रोड व पारडी बाजारात फूलकोबी ४० रुपये, महाल व सोमवारी क्वाॅर्टर ५० रुपये, सतरंजीपुरा बाजारात ६० रुपये भाव आहे. याशिवाय भेंडीच्या भावातही बरीच तफावत आहे. नंदनवनमध्ये ५० रुपये, महाल ४० रुपये, पारडी ४० रुपये, धरमपेठ व सोमलवाड्यात ६० रुपये भाव आहे.
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !
ठोक बाजारात जिल्ह्यातील शेतकरी हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, फूलकोबी, चवळी व पालक भाजी, चवळी शेंगा विक्रीला आणतात. कालच्यापेक्षा आज जास्त भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; पण बाजारातील अडते आणि व्यापारी शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत भाज्या खरेदी करतात. पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात, असा अनुभव आहे. सावनेर येथील देवानंद ठाकरे म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये गुरुवारी टोमॅटोला १५ ते २० रुपये किलो भाव मिळाला; पण व्यापाऱ्यांनी ३० रुपये किलो भावाने विक्री केली. जास्त मालाचे रोखीने पैसे मिळत असल्याने एवढा भाव मिळाल्याचे समाधान आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोला १० रुपये किलो भाव मिळाला होता.
बाजारात आवकीच्या प्रमाणावर भाज्यांचे भाव ठरतात. त्यामुळे दरदिवशी भाज्यांचे भाव सारखे नसतात. कोथिंबिरीची आवक कमी असल्याने शेतकऱ्यांना ६० रुपये किलो, तर फूलकोबीला २० रुपये भाव मिळाला. व्यापारी शेतकऱ्यांकडून रोखीने माल खरेदी करतात. त्यामुळे फरक असतोच.
-राम महाजन, व्यापारी
कळमना बाजारात अन्य जिल्हे आणि राज्यांतील भाज्यांची आवक होते. माल खरेदी करताना व्यापारी आणि आडत्यांचा नफा ठरलेला असतो. ही साखळी अनेक वर्षांपासून सुरू आहे. व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो. आवकीच्या प्रमाणावर भाव ठरतात.
-नंदकिशोर गौर, व्यापारी
अर्धा पाव व किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही. त्यामुळे घराजवळील आठवडी बाजारात भाज्या खरेदी करतो; पण होलसेलपेक्षा दुप्पट भाव द्यावा लागतो. त्यामुळे बजेट बिघडते.
-सुनंदा सव्वालाखे, गृहिणी
कमी भावात भाज्यांची खरेदी ही कसरत आहे. ग्राहकांची मागणी पाहून विक्रेतेही जास्त भाव सांगतात. भाज्या चांगल्या दिसल्या की, जास्त भावातही खरेदी कराव्या लागतात. किरकोळमध्ये भाव जास्तच असतात.
-सोनम सुपले, गृहिणी