विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच : बेलगाम स्कूल बसेसवर ब्रेक कुणाचा ?नागपूर : स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आजही अनेक शाळांच्या बसमध्ये कंडक्टर नसल्याचे वास्तव आहे. पैसा कमविण्यासाठी ठिकठिकाणी उगवलेल्या शाळांच्या पिकांमुळे अवैध विद्यार्थी वाहतुकीचे गाजरगवत गल्लोगल्ली शहरात फोफावल्याचे चित्र आहे.नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. आॅटो, खटारा झालेले सहा सीटर, मारुती व्हॅन, बस आणि आता ई-रिक्षानेही विद्यार्थ्यांना वाहतुकीचा ‘माल’च बनवून टाकले आहे. चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी कित्येक कोवळे जीव साक्षात मृत्यू सोबत घेऊन शाळेत जात आहे. पवित्र शिक्षणाचा बाजार करून गल्लाभरू संस्थाचालकांना या नाजूक उमलणाऱ्या कळ्यांच्या सुरक्षेची खरेच काळजी आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी खच्चून भरलेल्या वाहनांना पाहून पडतो. बदलला तो केवळ स्कूल बसचा रंगस्कूल बस नियमावली लागू झाल्यानंतर पाच वर्षाच्या या कार्यकाळात केवळ स्कूल बसचा रंग बदलला. काही बसमधील आतील चित्र बदलले. परंतु बहुसंख्य बसचालक स्कूल बसचे नियम धाब्यावर बसवून धावत आहे. तज्ज्ञाच्या मते, आजही ३० टक्के स्कूल बसमध्ये कंडक्टर नाहीत. मुलींच्या बसमध्ये महिला कंडक्टर असणे आवश्यक असताना याकडेही दुर्लक्ष झाले आहे. २० टक्के वाहनांचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त आहे. चढण्याची खालची पायरी जमिनीपासून ३०० मि.मि. पेक्षा अधिक उंचीच्या आहेत. अनेक बसच्या दोन्ही बाजूस बहिर्गाेल आरसे नाहीत. वाहनात शाळेची दप्तरे ठेवण्याची व्यवस्था नाही. वाहनाच्या दरवाजास चाईल्ड लॉक बसवलेले नाहीत. काहींना तर आपात्कालीन दरवाजाही नाही. नावाचीच प्रथमोपचार पेटी तर अग्निशामक यंत्र वाहनात आरटीओत फिटनेसचे प्रमाणपत्र घेतानाच दिसून येते.
आणखी किती विरथ गमावणार ?
By admin | Published: January 09, 2016 3:22 AM