कमल शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कोळसा धुण्याच्या नावाखाली अधिकारी असोत, नेते असोत की व्यापारी असोत, कोल वॉशरीजने सुरू केलेल्या भ्रष्टाचाराच्या खेळात संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली दिसून येते. भ्रष्टाचाराच्या पैशाच्या वाटपाची चर्चाही लोकांना तोंडपाठ झाली आहे. दुसरीकडे कोल वॉशरीजचे कर्तेधर्ते हे ‘कच्ची चिठ्ठी’चा हवाला देत सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराची वकिली करण्यात गुंतले आहेत.
‘लोकमत’ने कोल वॉशरीजच्या गोलमालचा पर्दाफाश सुरू केल्यावर त्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, या भ्रष्टाचारात जे समोर दिसून येत आहेत, त्यांच्या मागे मोठ-मोठ्यांचे हात असून, हे हातही मालामाल होत आहेत. भ्रष्टाचारातून येणाऱ्या या पैशाच्या वाटपात कोणाला किती मिळत आहे, याची विशेष चर्चा आहे. ‘कच्च्या चिठ्ठी’वर थेट कोणाचेही नाव लिहिले जात नसल्याने तज्ज्ञ त्याचे डीकोडिंग करीत आहेत. ते प्रामाणिक पद्धतीने डीकोड करून लवकरच वाचकांसमोर मांडण्याचा ‘लोकमत’ प्रयत्न करीत आहे. तूर्तास, कच्च्या चिठ्ठीच्या आधारे जी चर्चा सुरू आहे, ती अशी... असे मानले जाते की, प्रत्येक मेट्रिक टनानुसार प्रत्येकाची हिस्सेदारी ठरलेली आहे. कोल वॉशरींना प्रति टन कोळशाच्या धुण्यावर ३२५ रुपयांचा नफा होतो. यापैकी १६० रुपये वाटले जातात. जेवढी ज्याची ताकद अधिक तेवढा त्याचा वाटा आहे. कुणाची हिस्सेदारी १०० रुपये आहे, तर कुणाला पाच रुपये आहे. एका नेताजींना १५ रुपये मिळत असल्याचे पत्रात म्हटले आहे. लाभार्थ्यांमध्ये नागपूरचेच नव्हे तर, चंद्रपूरचाही महारथी सहभागी आहे.
कोल वॉशरीचा गोलमाल
सूत्रांनी त्या कच्च्या चिठ्ठीची एक प्रत सोबत ठेवत असा दावा केला आहे की, कोल वॉशरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही सक्रिय संस्था, संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचाही लाभार्थ्यांच्या यादीत समावेश आहे. त्यामुळे या कोल वॉशरीजमधील कामगारांनी आवाज उठविणे बंद केले आहे. दुसरीकडे, त्या परिसरातील अनेक असामाजिक तत्त्वे कोल वॉशरीजच्या ‘पेरोल’वर आहेत. ओव्हरलोडिंगपासून ते कोळशाच्या वाहतुकीपर्यंत त्यांना ‘पैसा’ दिला जात आहे.