लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रह्मांड निर्मिती आणि त्यातील तथ्यांचे कोडे आपल्याला समजले आहे, हा गैरसमज अनेक संशोधकांना आहे. मात्र प्रत्यक्षात ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. महास्फोटाची संकल्पना चुकीची असेल या शक्यतेकडे संशोधकांचे दुर्लक्ष झाले. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिक विश्वासंदर्भात २६ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेअगोदर ‘ब्रह्मांडाचे कोडे आपल्याला कितपत उलगडले आहे’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. नारळीकर रविवारी बोलत होते.गांधीसागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘सिरी’चे अध्यक्ष आ. अनिल सोले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमरकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे,‘जेएनपीटी’चे राजेश बागडी प्रामुख्याने उपस्थित होते. ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली यासारख्या प्रश्नांचे आकर्षण मनुष्याला नेहमीच राहिले आहे. याबाबत विविध तर्क मांडण्यात आले. पुस्तके लिहिण्यात आली. परंतु लेखकांनी आपल्याला सर्वच समजले आहे, या आविर्भावात पुस्तके लिहिली आहेत. पायथागोरसने पृथ्वी सूर्य नव्हे तर वेगळ्याच अग्निकुंडाभोवती प्रदक्षिणा घालते व सोबत प्रतिपृथ्वीदेखील आहे, असे विधान केले होते. त्यानंतर फ्रीडमन व लेमात्रे यांनी ब्रह्मांडाच्या संकल्पना मांडल्या व हबल आणि ह्युमॅसन यांच्या संशोधनाची त्याला जोड मिळाली. परंतु १९७० नंतर निरीक्षणांचा कोणताही आधार नसलेल्या अग्राह्य कल्पनांचे पीकच विश्वोत्पत्ती शास्त्रात आले आहे. ‘बिगबँग’ म्हणजेच महास्फोटाच्या वेळी नेमके काय घडले असावे, यासंदर्भात अनेक जण कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्या घेत आहेत,असे डॉ.नारळीकर म्हणाले. जी वस्तू स्वयंप्रकाशित किंवा परप्रकाशित नाही, ती आपल्याला दिसत नाही. ब्रह्मांडात अशा अनेक अदृश्य वस्तू असणारच. परंतु या वस्तू नेमक्या काय आहेत, याबाबत कुणालाच काही सांगता आलेले नाही. मायक्रोवेव्ह तरंगाच्या बाबतीतदेखील असेच घडले. विश्वोपत्ती शास्त्रातील ब्रेन, फँडम फिल्ड्स, अदृश्य वस्तू इत्यादी गृहितांना कुठलाही प्रायोगिक आधार नाही. त्यामुळेच आधुनिक व प्राचीन काळातील कल्पनांमध्ये अवास्तवतेचे साम्य आहे, असेदेखील डॉ. नारळीकर यांनी प्रतिपादन केले. ‘सिरी’चे संचालक डॉ.संजय वाघ यांनी संचालन केले.