लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होत आहे. सलग दोन दिवसांपासून लोकमतने हा विषय उचलून धरला आहे. यासंदर्भात स्पर्धेचे इंचार्ज योगेश खोब्रागडे यांना विचारणा केली असता, आम्ही काय करणार? १५ हजार रुपयांत होतात का स्पर्धा? गेल्यावर्षीचा क्रीडा स्पर्धेचा निधी अजूनही मिळालेला नाही? यासाठी आयोजक जबाबदार नसून शासन जबाबदार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.मानकापूर क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय, शहरस्तरीय व विभागीय अशा सहा दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या दिवशी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नव्हती. आॅक्टोबर हिटचा चटका सहन करीत विद्यार्थी उन्हात दम टाकत बसल्याचे चित्र होते. त्यांच्यासाठी सावलीची सोय करण्यात आली नव्हती. चेंजिंग रुम, शौचालयाची सोय, प्राथमिक उपचार या सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आल्या नव्हत्या.यासंदर्भात आयोजन प्रमुखांनी सांगितले की, जवळपास ४५० च्या जवळपास विद्यार्थी या स्पर्धेसाठी येतात. १५ हजार रुपये या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. त्यातही स्टेशनरीचे २५०० रुपये कापून घेतल्या जातात. दररोजचा पाण्याचा खर्च हा चार हजार रुपयांवर येतो. रेफरी आणि कोचचे आठ ते दहा हजार रुपये पेड करावे लागतात. पेंडॉल खुर्च्या याचा खर्च किमान १० हजार रुपये येतो. मिळणाऱ्या निधीपेक्षा खर्चच जास्त असल्याने कुठून करणार विद्यार्थ्यांच्या सोयी असा सवाल त्यांनी केला. निधीअभावी आम्ही कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध करू शकत नाही. साधी वीजसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. २०० रुपयांच्या बॅटरीवर साऊंडचे काम सुरू आहे. आयोजक काहीच करू शकत नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व विभागीय क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेचा निधी अजूनही मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. - शाळांकडून जमा होणारा पैसा जातो कुठे?शाळांकडून क्रीडा शुल्काच्या नावाने जिल्हा क्रीडा परिषद पैसा गोळा करते. या परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. हा निधी वर्षाला किमान १४ ते १५ लाख जमा होत असल्याचे सांगण्यात येते. यातून तुटपुंजी रक्कम स्पर्धेच्या आयोजनासाठी मिळते. तेही अॅडव्हान्स मिळत नाही. जिल्हा क्रीडा परिषदेकडे जमा होणारा क्रीडा स्पर्धेचा निधी इतर हेडवर खर्च केल्या जात असल्याची माहिती आहे.
१५ हजार रुपयांत कशा होणार स्पर्धा?; आयोजक हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:24 AM
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होत आहे.
ठळक मुद्देगेल्यावर्षीचा स्पर्धेचा निधीच मिळाला नाही