लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीवर ‘स्क्रब टायफस’ची दहशत आहे. गेल्या २० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, असे असताना रुग्णालयात या आजाराचे निदान करणारी ‘आयजीएम’ ही चाचणीच होत नाही, शिवाय यावर दिले जाणारे ‘डॉक्सीसायक्लीन’ औषध किंवा इंजेक्शन स्वरुपातही उपलब्ध नाही. यामुळे कसा वाचणार रुग्णांचा जीव, असा प्रश्न रुग्णांच्याच नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.‘चिगर माईट्स’ नावाच्या अतिशय सूक्ष्म कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ आजाराचे नागपूर जिल्ह्यात रुग्ण दिसून येऊ लागल्याने व मृतांचा आकडा वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत मृतांमध्ये शहरातील जरीपटका, महालसह जिल्ह्यातील काटोल, नगरखेड व एक रुग्ण मध्य प्रदेशातील आहे. जे उपचार घेत आहे त्यामध्ये नरखेड, अमरावती, कोंढाळी, डोंगरगाव, कामठी, मध्य प्रदेशातील बैतुल व सिवनी येथील आहेत. यातील चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून उर्वरित रुग्णांना स्वाईन फ्लूच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये ठेवण्यात आले आहे. या आजारावर तातडीने निदान होऊन वेळेत औषधोपचार मिळाल्यास रुग्ण वाचतो. परंतु आशिया खंडातील दुसºया क्रमांकाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात या आजाराचे निदान करण्याची चाचणी होत नसल्याचे वास्तव आहे. भरती रुग्णाच्या एका नातेवाईकाने सांगितले, वॉर्डातील निवासी डॉक्टराने रक्त काढून बाहेरून तपासणी करण्यास सांगितले. या शिवाय, औषधेही बाहेरून आणण्यास सांगतात. नाव न लिहिण्याच्या अटीवर एका डॉक्टराने सांगितले,या आजाराचे वेळीच निदान झाले नाही, तर शरीरात दबा धरून बसणारे हे परजीवी मेंदूची, मूत्रपिंडाची क्रिया बंद पाडू शकतात. यामुळे तातडीने निदान होणे आवश्यक आहे. परंतु अनेक रुग्णांकडे पैसे नसल्याने बाहेरून निदान करण्यास उशीर होतो. परिणामी, उपचारातही उशीर होतो. अशामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो. सध्या रुग्णालयात रक्ताद्वारे करण्यात येणारी चाचणी ‘आयजीएम’ होत नाही. यातच ‘डॉक्सीसायक्लीन’ हे गोळ्यांच्या स्वरुपात किंवा इंजेक्शनच्या स्वरुपात उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. वॉर्डात दोन स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यांच्यासोबत या आजाराच्या रुग्णांनाही ठेवण्यात आल्याने, नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्क्रब टायफसचे कसे वाचणार रुग्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:36 PM
उपराजधानीवर ‘स्क्रब टायफस’ची दहशत आहे. गेल्या २० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, असे असताना रुग्णालयात या आजाराचे निदान करणारी ‘आयजीएम’ ही चाचणीच होत नाही, शिवाय यावर दिले जाणारे ‘डॉक्सीसायक्लीन’ औषध किंवा इंजेक्शन स्वरुपातही उपलब्ध नाही. यामुळे कसा वाचणार रुग्णांचा जीव, असा प्रश्न रुग्णांच्याच नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
ठळक मुद्देमेडिकल : चाचणीही होत नाही, औषधेही नाहीत