लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या उन्हाळी परीक्षांना ११ मेपासून सुरुवात होणार आहे, तर ५ ते २० मेदरम्यान महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. याचाच अर्थ महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी एकच आठवडा मिळणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक तणावात आहेत. सध्याची स्थिती पाहता एकाच वेळी प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा महाविद्यालय पातळीवर घेण्याचे परिपत्रक स्थगित करावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.
विदर्भात बहुतांश घरांमध्ये एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आहे किंवा कुणाचा तरी नातेवाईक कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य व इतर कर्मचारी मानसिक तणावात आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढविला आहे. एकूण स्थितीच गंभीर असून, परीक्षा देण्याची अनेक विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. ५ ते २० मेदरम्यान प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा ऑनलाइन किंवा मिक्स मोडमध्ये घेण्यासंदर्भात सर्व परिपत्रक मागे घेण्यात यावे, अशी मागणी सिनेट सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी केली आहे.
अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या वर्गांना साधारणतः फेब्रुवारी महिन्यात सुरुवात झाली. ११ मेपासून त्यांची परीक्षा सुरू आहे; परंतु ९० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार कसा, असा प्रश्न प्राध्यापकांना पडला आहे. अनेक विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यातच ५ मेपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या तर वर्ग होणार नाही. त्यामुळे पुढील पाच दिवसांत अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार, असा प्रश्न प्राध्यापकांसमोर उभा आहे.