लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाचा लहरीपणा, शासनाने घोषीत केलेली मदत मिळत नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नाही. कापूस, सोयाबीनला भाव नाही. दुसरीकडे बि-बियाणे व खतांच्या किमती मात्र दामदुप्पट वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती नाईलाज म्हणून करावी लागते, अशी व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यापुढे मांडली.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी बुधवारी दौऱ्याप्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील कापसाची लागवड करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर मजुराची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. पेरणीजोगा पाऊस झाला नसतानाही कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतमाालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षात बियाणाचे व खताचे दुपटीने वाढले आहेत. दुसरीकडे कापसाला भाव नाही. त्यामुळे लागणार खर्चही निघत नाही.
केंद्रशासन व राज्य शासनाने दोन हजाराची मदत न करता आमच्या शेतमालाला भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केल्याची माहिती मुक्ता कोकड्डे व कुंदा राऊत यांनी दिली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बि-बियाणे व खो उपलब्ध होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले.