नागपूर : घाेणस अळी (स्लग कॅटरपीलर) सहा दिवसांपूर्वी काटाेल तालुक्यातील डाेरली (भिंगारे), तर दाेन दिवसांपूर्वी खानगाव, काेळंबी, पारडसिंगा (ता. काटाेल) या शिवारात आढळून आली आहे. या अळीच्या केसांचा माणसांच्या त्वचेला स्पर्श हाेता शरीराला लाल चट्टे पडणे, अग्निदाह हाेणे यासह अन्य लक्षणे दिसतात. मात्र, शेतकऱ्यांनी न घाबरता या अळीचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी केले आहे.
घातक असलेली ही घाेणस अळी नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदा शुक्रवारी (दि. १६) पंढरी विठाेबा तिडके, रा. डाेरली (भिंगारे), ता. काटाेल यांच्या शेतातील नेपियर वाणाच्या गवतावर, तर बुधवारी (दि. २२) राजेंद्र इंगाेले, रा. काेळंबी, ता. काटाेल यांच्या शेतातील गवतावर आढळून आली आहे. कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे, तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी डाेरली (भिंगारे) शिवारातील या अळीची लगेच पाहणी करून शेतकऱ्यांना या अळीपासून स्वत:चा व पिकांचा बचाव कसा करायचा, याबाबत मार्गदर्शन केले.
या अळीच्या शरीरावरील बारीक केसांमध्ये संरक्षित विषारी रसायन (प्राेटेक्टेड टाॅक्सिक केमिकल) असते. केस माणसांच्या त्वचेमध्ये टोचल्यास अळी विषारी रसायन त्वचेमध्ये सोडते. त्यामुळे खूप दाह हाेणे, त्वचा लाल होणे, त्वचेचे रिॲक्शन, त्वचा सुजणे, डोळे लाल होणे, खूप आग होणे, त्वचेवर चट्टे पडून गांधील माशीचा डंकसारखा अग्निदाह हाेणे अशी लक्षणे दिसून येतात. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. काहींना हा दाह सौम्य असतो. ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येतात.
कोणकोणत्या पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव?
घाेणस अळी ही बहुभक्षी कीड आहे. तीगवत, एरंडी, मका, आंब्याच्या झाडावर प्रामुख्याने, तर तृणवर्गीय पिके व काही फळपिकावर तुरळक प्रमाणात आढळून येते. ही अळी पिकांची पाने खात असल्याने नुकसानीची तीव्रता वाढले व उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
या अळीवर नियंत्रण कसे ठेवाल?
या अळीच्या व्यवस्थापनासाठी विशिष्ट कीटकनाशकांची शिफारस नसली तरी क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी) किंवा प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी) किंवा क्विनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी) किंवा इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी) यापैकी एक कीटकनाशक व पाच टक्के निमार्कची फवारणी करावी.
कुठे आढळते ही अळी?
ही अळी खादाड असल्याने झपाट्याने पानांवरील हिरवा भाग खाऊन फस्त करते व पानांना केवळ शिरा शिल्लक ठेवते. ती शक्यतो पावसाळ्यात, परतीच्या पावसाचा काळ आणि उष्ण व आर्द्र हवामानात शेताच्या धुऱ्यावर किंवा शेतातील तृणवर्गीय पिकांवर माेठ्या प्रमाणावर आढळून येते.
दंश झाल्यास काय कराल?
शेतकऱ्यांनी या अळीला घाबरून न जाता गवत काढताना किंवा शेतातील कामे करताना या किडीचे निरीक्षण करून ती आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. ती त्वचेच्या संपर्कात आल्यास चिकट टेप त्या भागावर चिकटवून ताे हलक्या हाताने काढावा. त्या ठिकाणी बर्फ तसेच बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावावी. लक्षणे तीव्र असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. अळीच्या व्यवस्थापनासाठी गवतावर कीटकनाशकाची फवारणी केल्यास ते गवत फवारणीनंतर किमान सात दिवस गुरांना खाऊ घालू नये.
ही अळी तिच्या स्वरक्षणासाठी केसांमधील विषारी रसायन माणसांच्या त्वचेत साेडते. ती सहसा माणसांच्या दिशेने येत नाही. मित्र किडींमुळे घाेणस अळीचे नियंत्रण हाेते. कीटकनाशकांच्या फवारणीतून व्यवस्थापन करता येते. शेतकऱ्यांनी या अळीला घाबरू नये. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे.
- डाॅ. प्रदीप दवणे, कीटकशास्त्रज्ञ,
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेला.