ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : प्रशासनाने काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी लसीकरण माेहीम सुरू केली आहे. ही लस घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. काेंढाळी (ता. काटाेल) येथे सध्या किमान १० वेडसर व्यक्तींचा मागील १२ ते १४ वर्षांपासून मुक्तसंचार आहे. या व्यक्ती कुणाच्या ना कुणाच्या संपर्कात येत असल्याने त्यांना काेराेनाची लागण हाेण्याची आणि ते काेराेना स्प्रेडर हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना काेराेनापासून वाचविण्यासाठी त्यांचे लसीकरण करायचे कसे, हा प्रश्न प्रशासनासमाेर निर्माण झाला आहे.
काेंढाळी येथील प्राथमिक आरेाग्य केंद्रात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी ज्येष्ठांसह नाेंदणीकृत व्यक्तीही प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रतीक्षा करीत असल्याचे राेज दिसून येते. या सर्व बाबी स्थानिक मानसिकदृष्ट्या निकाेप असलेल्या व्यक्तींसाठी ठीक आहेत. मात्र, वेडसर व्यक्तींना लस द्यायची कशी, असा यक्षप्रश्न आराेग्य विभागासमाेर निर्माण झाला आहे. सध्या काेंढाळी येथे किमान १० वेडसर व्यक्तींचे मागील १२ ते १४ वर्षांपासून वास्तव्य असून, त्यांचा राेज मुक्तसंचार सुरू असताे.
ते मिळेल ते खातात आणि जागा मिळेल तिथे झाेपतात. अंघाेळ, साफसफाई त्यांच्या गावी नसते. ही त्यांची दैनंदिनी आहे. विशेष म्हणजे, काेंढाळी येथील नागरिक या वेडसर व्यक्तींना राेज खायला देतात. प्रसंगी कपडे व पांघरायलादेखील देतात. त्यामुळे या वेडसर व्यक्ती राेज कुणाच्या ना कुणाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात येतात. ते काेराेना संक्रमित हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचेही इतरांप्रमाणे लसीकरण करणे गरजेचे आहे.
...
नवनवीन लाेकांची ये-जा
काेंढाळी हे गाव नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे अधूनमधून वेडसर व्यक्तींना मालवाहू वाहनांद्वारे आणून साेडले जाते. ते काही दिवसांनी काेणत्याही वाहनाने कुठेही निघून जातात. काहींचा अपघाती तर काहींचा नैसर्गिक मृत्यूही झाला. मात्र, यातील १० जण काेंढाळी येथे वास्तव्यालाच आहेत. लसीकरणासाठी नाव, पत्ता सांगणे व ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. या वेडसर व्यक्ती स्वत:चे नाव, पत्ता काहीही सांगत नाहीत. त्यांच्याकडे ओळखपत्र असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
...
दीपक गुल्हानी
एक वेडसर तरुण १५ वर्षांपासून काेंढाळी येथे वास्तव्याला आहे. ताे त्याचे नाव दीपक गजेंद्र गुल्हानी असे सांगताे. ताे मूळचा कुठला रहिवासी आहे, कुठून आला, कशाने आला याबाबत काहीही सांगत नाही. इतर वेडसर व्यक्ती त्यांची नावेदेखील सांगत नाहीत किंवा कुणाशी बाेलतही नाहीत. त्यांच्याकडे मूलभूत माहिती नसल्याने त्यांची लसीकरणासाठी नाेंदणी करायची कशी, हाही प्रश्न निर्माण हाेताे.