नागपुरात ३५ हजारापैकी ३,२०० फेरीवाल्यांचीच नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बंदच्या काळात होणारे हाल लक्षात घेता दुर्बल घटकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. यात फेरीवाल्यांचाही समावेश आहे. त्यांना प्रत्येकी १५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र ही मदत नोंदणीकृत फेरीवाल्यांनाच मिळणार आहे. नागपूर शहरात ३५ हजाराहून अधिक फेरीवाले आहेत. यातील फक्त ३,२०० फेरीवाल्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित ३२ हजार ५०० फेरीवाल्यांना घोषणेचा लाभ कसा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गतकाळात करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार नागपूर शहरात ३५ हजार फेरीवाले असल्याचे आढळून आले होते. आता ही संख्या त्याहून अधिक आहे. यातील बहुसंख्य फेरीवाल्यांनी मनपाकडे नोंदणी केलेली नाही. अनेकांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड नाही. अशा फेरीवाल्यांना मदत वाटप करताना प्रशासनाला अडचण येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत नागपुरात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड व आधारकार्ड नाही. अशा फेरीवाल्यांना मदत करताना तांत्रिक अडचण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.