रामटेकचा गड काँग्रेस कशी करणार सर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 08:18 PM2019-08-28T20:18:12+5:302019-08-28T20:22:50+5:30

रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे.

How will Congress capture the Ramtek fort ? | रामटेकचा गड काँग्रेस कशी करणार सर?

डी.मल्लिकार्जुन रेड्डी, राजेंद्र मुळक, आशिष जयस्वाल

Next
ठळक मुद्देभाजप-सेनेच्या उमेदवाराचे चित्र अस्पष्ट : चालणारा, लढणारा, व जिंकणारा उमेदवार देण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे. लोकसभेत रामटेकमध्ये भगवा फडकला. त्यामुळे यावेळी काँग्रेसपुढे सर्व बाबींचा विचार करून लढणारा व जिंकणाराच उमेदवार देण्याचे आव्हान असणार आहे.
गेल्यावेळी भाजप-सेना युती नव्हती. त्यावेळी भाजपाकडून लढलेले आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले. शिवसेनेचे माजी आ. आशिष जैस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळीही अद्याप युती होणार की नाही हे स्पष्ट नाही. युती झाली तर रामटेकची जागा भाजपला सुटेल की शिवसेनेला, भाजपला गेली तर रेड्डी यांनाच उमेदवारी मिळेल की नवा चेहरा दिला जाईल, हे स्पष्ट नाही. रामटेकची जागा शिवसेनेच्या स्वाभिमानाशी जोडली गेली आहे. त्यामुळे येथे भाजप लढली तर आशिष जयस्वाल यांच्यासह स्थानिक शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतील यावरही बरेच काही अवलंबून आहे.
युतीत सर्वकाही आलबेल झाले व एकच उमेदवार रिंगणात उतरविला तर मात्र काँग्रेसची अग्निपरीक्षा होईल. काँग्रेसला खूप परिश्रम तर घ्यावेच लागतील पण सोबतच निवडणूक लढणाराच नव्हे तर निवडणूक काढणारा उमेदवार द्यावा लागेल. काँग्रेसच्या उमेदवारावर बराचसा निकाल अवलंबून असेल, असे मतदार उघडपणे बोलून दाखवित आहेत. रामटेकमध्ये काँग्रेसकडून अनेक दावेदार आहेत. पर्यटक मित्र व काँग्रेसच्या राज्य पर्यटन सेलचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लढलेले डॉ. अमोल देशमुख, जिल्हा सरचिटणीस उदयसिंग यादव, माजी जि.प. सभापती सुरेश कुंभरे, युवक कॉँग्रेसचे सचिन किरपान, हर्षवर्धन निकोसे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक देखील गेल्या काही वर्षांपासून रामटेकच्या कानाकोपऱ्यातील गावात पोहचून काम करीत आहेत. मात्र, सर्वांनी विश्वास दाखविला तरच निवडणूक लढू, अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
रामटेकमध्ये काँग्रेसने भाजप- सेनेला तोडीची टक्कर देणारा, लढण्याची क्षमता असलेला, प्रशसकीय अनुभव असलेला व नावापुढे राजकीय वलय असलेला उमेदवार दिला तर रामटेकची निवडणूक रंगात येऊ शकते. रामटेकमध्ये गटबाजीचा फटका काँग्रेसला बसत आला आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन चालणारा, आपल्या राजकीय उंचीचा वापर करून सर्वांना न्याय मिळवून देण्याची क्षमता असलेला व जनतेला आश्वासक व आपलासा वाटणारा उमेदवार दिला तर काँग्रेस येथे चांगली लढत देऊ शकते. अन्यथ रामटेकची निवडणूक काँग्रेससाठी फक्त खानापूर्ती ठरेल.

 

Web Title: How will Congress capture the Ramtek fort ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.