लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील संक्रमणाचा मनपा प्रशासनाने सामना केला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच राधाकृष्णन बी. यांनी पहिल्या लाटेचा व नंतर दुसऱ्या लाटेतील संक्रमण रोखण्यासाठी नियोजन केले. संक्रमण रोखण्यात यश आले. त्यांच्या मदतीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलज शर्मा, संजय निपाणे होते. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना, आता तिन्ही अतिरिक्त आयुक्त मनपात नाहीत.
जलज शर्मा यांच्याकडे रुग्णालय व्यवस्थापनाची जबाबदारी होती. त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. संजय निपाणे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. ३१ जुलैला ते सेवानिवृत्त झाले आहेत. दोन्ही लाटेत प्रभावीपणे काम करणारे राम जोशी यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. त्यांची चंद्रपूर येथे पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. काही दिवसापूर्वी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. मनपा आयुक्त त्यांना सोडण्याच्या विचारात नाही. माहितीनुसार त्यांना नवीन ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक कोरोना लाटेत सुरुवातीला सर्वांच्या मनात भीती असताना राम जोशी शहरातील हॉटस्पॉट भागात फिरून नियोजन करीत होते. त्यांनी तक्रारी सोडवून नागरिकांना धीर दिला. आयुष रुग्णालयात ऑक्सिजन लिकेज झाल्याचे कळताच घटनास्थळी पोहचले होते व परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण आणले.
सध्या दीपक कुमार मीणा अतिरिक्त आयुक्त आहेत. परंतु त्यांनी काही दिवसापूर्वीच पदभार स्वीकारला. दुसरीकडे मनपाचा आरोग्य विभाग रामभरोसे आहे. पहिल्या लाटेत आरोग्य उपसंचालकपदाची जबाबदारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी सांभाळली होती. ते संक्रमित झाले होते. कामाच्या ताणामुळे ते पुन्हा मनपात आले नाही. डॉ. संजय चिलकर यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. संक्रमणाला आळा घालण्यात व्यस्त आहेत. परंतु मनपाच्या आरोग्य विभागात अधिकाऱ्यांची कमी आहे. डॉ. प्रवीण गंटावार दीर्घ रजेवर आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली. परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. दुसरीकडे रुग्णावहिका, मृतदेह घाटापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडणारे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार सेवानिवृत्त झाले आहेत. डॉ. गजेंद्र महल्ले यांना घनकचरा विभागाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मनपातील अन्य अधिकाऱ्यांकडे आधीच अनेक विभागांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेत त्यांच्यावर अधिक भार राहणार आहे.
.......
उत्तम व्यवस्थापनच प्रभावी ठरणार
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाला उत्तम व्यवस्थापन करावे लागणार आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव आहे. परंतु तिसरी लाट कशी राहील, हे आताच सांगता येणार नाही. याचा विचार करता संक्रमणापूर्वीच त्याला आळा घालण्यासाठी नियोजन करावे लागेल.