लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवास व्यवस्था असणारी हॉटेल जवळपास साडेतीन महिन्यानंतर बुधवार, ८ जुलैपासून सुरू होणार आहे. ग्राहकांची काळजी, नियमांचे पालन, सॅनिटायझेशन, मास्क, ग्लोव्हज आदींचा वापर करून आणि एकूण क्षमतेच्या ३३ टक्के उपयोग करूनच हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. सध्या पर्यटन स्थळ खुली आहेत, पण अन्य शहरे, राज्यातील आणि विदेशातील पर्यटक नागपुरात येणार नाहीत. हॉटेलमध्ये चर्चासत्र, कार्यशाळा आणि अन्य कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असल्याने हॉटेलमध्ये येणार कोण, असा सवाल हॉटेल मालकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.कार्यप्रणाली ठरवून देत व्यावसायिकांना हॉटेल सुरू करण्याची राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश सोमवारी काढण्यात आले आहेत. आदेशात ग्राहक आणि हॉटेल मालक व संचालकांवर बंधने टाकण्यात आली आहेत.लॉकडाऊननंतर साडेतील महिन्यात हॉटेल मालकांना तोटा सहन करून हॉटेलची व्यवस्था आणि साफसफाई तसेच व्यावसायिक दराने विजेचे बिल भरावे लागत आहे. कामगारांचा पगारही द्यावा लागत आहे. एकंदरीत पाहता आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. हे नुकसान वर्षभर भरून निघणार नाही. निवासी हॉटेल सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली असली तरीही मोठ्या हॉटेलमध्ये थोडेफार उद्योजक, कॉर्पोरेट आणि सरकारी अधिकारी येतील, पण त्यांच्या येण्याने हॉटेलचा खर्च निघणार नाही. हॉटेल सुरू झाल्यानंतरही मालकाला नुकसान होणारच आहे. हॉटेल कसेतरी सुरू राहावे, अशी तळमळ आहे. हॉटेल सुरू झाल्यानंतरही ग्राहक येणार वा नाही, याची शाश्वती नाही. असे असतानाही खर्च नेहमीप्रमाणेच येणार आहे. स्वत:कडून सुरक्षा व्यवस्था करण्याचाही खर्च वाढणार असल्याचे काही हॉटेल मालकांनी सांगितले.हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांचा विदेशात प्रवास, देशाच्या इतर राज्यात प्रवास, नागपुरात येण्याचे प्रयोजन, कामाचे स्वरूप, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि अन्य माहिती राहणार आहे. त्याकरिता सुरक्षितता हाच आधार राहणार असल्याचे हॉटेल मालकांनी स्पष्ट केले.सिंगापूर येथील कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बैठक होणार आहे. बैठकीनंतरच हॉटेल सुरू करायचे वा नाही, यावर निर्णय होणार असल्याचे हॉटेल रॅडिसन ब्ल्यूचे व्यवस्थापक विकास पाल यांनी सांगितले. काही हॉटेल मालकांनी परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हॉटेल सुरू करणार नाही, असे मत व्यक्त केले. .
कोविड नियमांचे तंतोतंत पालनहॉटेल ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यापासून जाईपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात येणार आहे. डिजिटल पेमेंट, क्यूआर कोड आणि रेस्टॉरंटमध्ये वा खोलीत त्यांना जेवण देण्यात येईल. कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी व आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.सुजीत सिंग, महाव्यवस्थापक, हॉटेल प्राईड.
नियमावली पाळण्यावर भरहॉटेलमधील ३३ टक्के खोल्या ग्राहकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. ६७ टक्के डॉक्टरांसाठी वेगळी व्यवस्था आहे. ग्राहकांसाठी वेगळी लिफ्ट आणि प्रवेशाची वेगळी सोय आहे. मास्क, सॅनिटाईज्ड आणि शासनाची नियमावली पाळण्यावर भर आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची वारंवार तपासणी करण्यात येत आहे. गेस्ट गेल्यानंतर खोली आधुनिक पद्धतीने सॅनिटाईज्ड करण्यात येणार आहे. प्रवेशद्वारापासूनच चोख व्यवस्था आहे.जसबिरसिंग अरोरा, व्यवस्थापकीय संचालक, हॉटेल सेंटर पॉर्इंट.
ग्राहकांच्या स्वागतासाठी हॉटेल्सची तयारीअसोसिएशनच्या ९४ सदस्यांनी हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या स्वागताची तयारी केली आहे. ग्राहक, हॉटेल आणि कर्मचाºयांसाठी एक नियमावली तयार केली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. प्रवेशद्वारापासून खोल्या सॅनिटायईज्ड राहणार आहे. ग्राहकांना मास्क व सॅनिटायझर तसेच तापमान घेण्यात येणार आहे. ग्राहक एका खोलीत राहिल्यास ती खोली २४ तास रिकामी ठेवणार आहे. त्यांचे जेवण रेस्टॉरंट वा खोलीत राहील.तेजिंदरसिंग रेणूू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशन.