लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ४४७ झोपडपट्ट्या आहेत. यातील २८७ नोटीफाईड तर १३७ नॉननोटीफाईड आहेत. झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यासंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नसल्याने पट्टेवाटपात अडचणी येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. परंतु याकडे नगरसेवकांनी पाठ फिरविली. अशापरिस्थितीत झोपडपट्टीचा विकास कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राजीव गांधी बौद्धिक संपदा व व्यवस्थापन या राष्ट्रीय संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परंतु कार्यशाळेला अर्ध्याहून अधिक नगरसेवक अनुपस्थित होते. नगरसेवकांना मंगळवारी फोनवरून कार्यशाळेची माहिती देण्यात आली. ऐनवेळी माहिती मिळाल्याने व पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बहुसंख्य नगरसेवकांना इच्छा असूनही या कार्यशाळेला उपस्थित राहता आले नाही.झोपडपट्टी विकासासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती नगरसेवकांना असणे गरजेचे आहे, तरच झोपडपट्टीधारकांच्या शंकांचे निराकरण होईल. या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मात्र कार्यशाळा घाईगडबडीत आयोजित करण्यात आल्याने मोजकेच नगरसेवक या कार्यशाळेला उपस्थित होते.विकास आराखड्यानुसार जमीन वापराची आरक्षणे, झोपडपट्टीतील मालकी हक्काच्या पद्धती, नासुप्र, महापालिका व नझुलच्या जागेवरील पट्टेवाटप यासंदर्भातील शासन निर्णय याविषयी माहिती देण्यात आली. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन तर समारोप महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालिका लीना बुधे यांनी सादरीकरण केले. प्रारंभी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी प्रास्ताविक केले.सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, उपायुक्त राजेश मोहिते, नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे, सभापती अविनश ठाकरे, मनोज साबळे, किशोर जिचकार, वर्षा ठाकरे, दिव्या घुरडे यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होेते.
तर कसा होणार नागपूरच्या झोपडपट्टीचा विकास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:52 PM
झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यासंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नसल्याने पट्टेवाटपात अडचणी येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. परंतु याकडे नगरसेवकांनी पाठ फिरविली. अशापरिस्थितीत झोपडपट्टीचा विकास कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देकार्यशाळेकडे नगरसेवकांची पाठ : वेळेवर निरोप मिळाल्याने मोजकीच उपस्थिती