सुनील चरपे
नागपूर : नागपुरी संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात केली जात असून, बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर ८५ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क लावला आहे. त्यामुळे नागपुरी संत्र्याची आयात ८० टक्क्यांनी घटली आहे. संत्रा निर्यातीतील सातत्य कायम ठेवून निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारने संत्र्याच्या निर्यातीला ८५ रुपये प्रतिकिलो सबसिडी देणे अत्यावश्यक आहे, असे मत शेतमाल बाजारतज्ज्ञांसह महाऑरेंजच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
बांगलादेशने सन २०१९-२० मध्ये नागपुरी संत्र्यावर पहिल्यांदा २० रुपये प्रति किलो आयात शुल्क लावला. पाच वर्षांत हा आयात शुल्क प्रति किलो ६५ रुपयांनी वाढविण्यात आला. या आयात शुल्कात टप्प्याटप्प्यांनी वाढ करण्यात आल्याने बांगलादेशात नागपुरी संत्र्याचे दर वाढत गेले. ते सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने संत्र्याची निर्यात घटत चालली आहे. त्याचा फटका थेट संत्रा उत्पादकांना बसतो आहे. हा आयात शुल्क शून्य करण्यासाठी तसेच निर्यातीत सातत्य टिकवून ठेवत ते वाढविण्यासाठी नागपुरी संत्र्याला ८५ रुपये प्रति किलो सबसिडी देणे अत्यावश्यक आहे.
आयात शुल्कात सातत्याने वाढ
वर्ष - आयात शुल्क२०१९-२० - २० रुपये प्रति किलो२०२०-२१ - ३० रुपये प्रति किलो२०२१-२२ - ५१ रुपये प्रति किलो२०२२-२३ - ६३ रुपये प्रति किलो२०२३-२४ - ८५ रुपये प्रति किलो
आयात शुल्क रद्द करण्याची विनंती
यातून मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला संत्र्यावरील आयात शुल्क रद्द करण्याची विनंती करावी, अशी मागणी मध्यंतरी करण्यात आली होती. हा विषय बांगलादेश सरकारच्या अखत्यारीत असल्याने तसेच आयात शुल्क रद्द केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने बांगलादेश सरकार ही मागणी मान्य करणे शक्य नाही.
निर्यात ८० टक्क्यांनी घटली
बांगलादेश नागपुरी संत्र्याचा सर्वांत मोठा आयातदार देश असून, तुलनेत श्रीलंका, दुबई व इतर देशांमध्ये संत्र्यांची निर्यात फार कमी आहे. चार वर्षांपूर्वी भारतातून बांगलादेशात सरासरी २ लाख ४० हजार टन नागपुरी संत्रा निर्यात केला जायचा. आयात शुल्क लावल्याने ही आयात ८० टक्क्यांनी घटली असून, ती सरासरी ४६ ते ४८ हजार टनांवर आली आहे.